Tue, Jun 18, 2019 23:16होमपेज › Ahamadnagar › प्रांताधिकार्‍यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

प्रांताधिकार्‍यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:58AMपारनेर : प्रतिनिधी 

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडल्याच्या कारणावरून प्रांताधिकारी गोविंद दाणेज व त्यांच्या पथकावर ट्रॅक्टर घालून, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात सुनील चौधरी व अशोक चौधरी या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रांताधिकारी दाणेज हे शासकीय वाहनाने (क्र.एमएच 16 एन 569) अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणार्‍यांवर कारवाईसाठी शनिवारी रात्री 10.30 वाजता ढवळपुरी परिसरातील वाघवाडी येथे पोहचले. यावेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील कर्मचार्‍यांनी ट्रॅक्टर थांबविल्यानंतर चालक ट्रॅक्टर तेथेच सोडून पळून गेला. 

काही वेळानंतर सुनील चौधरी व अशोक चौधरी हे एका वाहनातून (क्र. एमएच 16 एटी 9592) तेथे आले. सुनील चौधरी यांनी हा ट्रॅक्टर त्यांच्या मालकीचा असल्याचे मान्य केले. वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने या वाहनावर कारवाई करण्यात येत असल्याची समज पथकातील कर्मचार्‍यांनी दिल्यानंतर अशोक चौधरी याने तहसील कार्यालयाकडे ट्रॅक्टर घेऊन जातो, असे सांगत ट्रॅक्टर सुरू केला. त्यानंतर त्याने ट्रॉलीतील वाळू तेथेच ओतून दिली. नंतर ‘तुमच्या वाहनाच्या चाकातील हवा सोडून देतो. आमच्या वाहनावर कोण कारवाई करतो’, असे म्हणत चौधरी याने या पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने ट्रॅक्टर स्वतःच्या शेताकडे पळवून नेला. 

पथकामध्ये प्रांताधिकारी दाणेज यांच्यासह भाळवणीचे तलाठी शशिकांत मोरे, ढवळपुरीचे तलाठी विराज वाघमारे, चालक एन. डी. तांदळे यांचा समावेश होता. रविवारी रात्री उशिरा ढवळपुरीचे तलाठी वाघमारे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर सुनील चौधरी व अशोक चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.