होमपेज › Ahamadnagar › चिमुरडीचा खून करण्याचा प्रयत्न

चिमुरडीचा खून करण्याचा प्रयत्न

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 10:46PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील काष्टी येथील चार वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. बेशुद्ध पडल्यानंतर तिला वीस फुट उंचावरुन खाली गटारात फेकून देण्यात आले. मात्रे दैव बलवत्तर म्हणून तिला कुठलीही इजा झाली नाही. या चिमुरडीवर बारामती येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दहा तासांत संशियत आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपीने दारूच्या नशेत मुलीच्या कानातील दागिने कात्रीने कापून घेत दोरीने गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची कबूली दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काष्टीतील तरुणाने वीस फूट उंचीवरुन काही तरी पडल्याचे पाहिले आणि त्याचा मोठा आवाज झाल्याने त्या तरुणाने तिकडे धाव घेतली. गटारीत एक चार वर्षाची चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. या तरुणाने चपळाई करत त्या मुलीला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या नाका तोंडात गेलेला चिखल काढत डॉक्टरांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची प्रकृति चिंताजनकच राहिली. त्यामुळे पुढील उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार झाल्याने तिचे प्राण वाचू शकले. 

दरम्यान, या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलिस निरिक्षक नीलेश कांबळे, पोलिस कर्मचारी अंकुश ढवळे, प्रकाश वाघ, किरण बोराडे, उत्तम राऊत, दादासाहेब टाके यांच्या पथकाने वेगात चक्रे फिरवत तपासला सुरुवात  केली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता एका संशियताचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र हाच आरोपी असल्याची पोलिसांना खात्री असल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात येतात तो पोपटा सारखा बोलू लागला. 

ही चार वर्षाची मुलगी घरात टीव्ही पाहण्यासाठी आली असता आरोपीने तिच्या कानातील सोन्याचे दागिने कात्रीने कापून घेतले. हे दागिने काढून घेत असताना तिचे दोन्ही कान तुटले आहेत. त्याचबरोबर पायातील पैंजणही काढून घेतले. चोरीचा प्रकार उघड होऊ नये म्हणून संशियत आरोपीने त्या मुलीचा दोरीने गळा आवळला. काही क्षणात मुलगी बेशुद्ध पडल्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्या मुलीला घराच्या  पाठीमागील गटारीत वीस फूट उंचीवरुन खाली फेकून दिले. 

तपास सुरु 

तपासी अधिकारी नीलेश कांबळे म्हणाले, की चिमुरडीला जीवे मारण्याच्या प्रकरणात एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक विचारपूस सुरु आहे. लवकरच सर्वकाही समोर येईल. 

दारुच्या नशेत कृत्य 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा व्यसनाधीन आहे. आठ दिवसांपासून त्याची पत्नी माहेरी गेल्याने घरी तो एकटाच होता. याच दरम्यान ही मुलगी घरी आल्याने त्याने हा प्रकार केला.