Sat, Jul 20, 2019 09:28होमपेज › Ahamadnagar › तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMनेवासा : प्रतिनिधी 

वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला वाळूतस्करांनी अंगावर जेसीबी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पथकाने ताब्यात घेतलेला जेसीबी त्यांनी पळवून नेला. डंपर मात्र पकडण्यात आला. सोमवारी (दि.6) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निंभारी-पाचेगाव शिवारात ही घटना घडली.

निंभारी-पाचेगाव शिवारात अवैध वाळूतस्करी सुरू असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर तामसवाडीचे तलाठी संभाजी थोरात, ए. डी. गव्हाणे, मंडल अधिकारी ए. जी. शिंदे यांच्यासमवेत शासकीय वाहनातून हे पथक निंभारीकडे निघाले. निंभारीतून पाचेगाव रस्त्याकडे जात असताना जाधव वस्तीजवळ पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर (एमएच- 34 एम-5159) पकडला. त्यानंतर डंपरचा चालक सागर हरिभाऊ पवार हा पळून गेला. पळून जात असताना त्याने पथकाला धक्काबुक्की केली. त्यानंतर वाळू उपशाच्या ठिकाणी पथक गेले असता, जेसीबी पळवून नेला जात असल्याचे निदर्शनास आले. पथकाकडून जेसीबीचा दुचाकीवरुन पाठलाग सुरू करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावर हा जेसीबी ताब्यात घेण्यात आला. 

त्यानंतर फरार झालेला चालक सागर पवार, हरिभाऊ अंबादास पवार यांच्यासह इतर 6 व्यक्ती तीन दुचाकींवरुन आले. त्यांनी  पथकाला धमकावत तहसीलदार उमेश पाटील यांच्या अंगावर जेसीबी  घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून दुचाकी तिथेच सोडून त्यांनी रस्त्याच्या बाजूला उडी मारली. यावेळी जेसीबी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलिसांना बोलावूनही जेसीबी पळवून नेण्यात वाळूतस्कारांना यश आले. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात सागर हरिभाऊ पवार, हरिभाऊ अंबादास पवार यांच्यासह इतर सहा जणांविरोधात तलाठी संभाजी थोरात यांनी फिर्याद दाखल केली आहे.नेवासा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी हे तपास करित आहेत.