Sun, Apr 21, 2019 06:32होमपेज › Ahamadnagar › जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न

जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:49AMनगर : प्रतिनिधी

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यावर्षी 241 गावांची निवड करून त्यासाठी 185 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यास जलयुक्त शिवार अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल राज्य पातळीवर गौरविण्यात आले. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून, येत्या काळात जिल्हा टँकरमुक्त आणि टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्य शासन नागरिकांसाठी करीत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

पोलिस दलाच्या पथकाने मानवंदना देत संचलन केले. त्यानंतर स्मार्ट ग्राम पुरस्कार, क्रीडा पुरस्कार आणि अहमदनगर पोलिस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक राजेंद्र पाटील, सुनील पवार, दिलीप पवार, विलास पाटील, एस. आर. जांभळे, सहायक निरीक्षक शरद गोर्डे, उपनिरीक्षक संदीप कहाळे, सहायक फौजदार रत्नाकर मकासरे, कर्मचारी विष्णू घोडेस्वार, सूरज वाबळे, संग्राम जाधव, निरीक्षक एस. आर. जांभळ (निवृत्त) यांना कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते तर सावेडीतील मुख्य प्रशासकीय इमारत येथे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.