Wed, Apr 24, 2019 21:27होमपेज › Ahamadnagar › जिल्हा विभाजनाबाबत विश्वासात घेऊ

जिल्हा विभाजनाबाबत विश्वासात घेऊ

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 11:43PMसंगमनेर : प्रतिनिधी 

नगर जिल्हा विभाजनाचा निर्णय झाल्यास संगमनेर तालुक्याची एकूण भौगोलिक व ऐतिहासिक स्थिती,  तसेच कृति-समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास तो अहवाल जिल्हा विभाजन समितीकडे पाठवू. असे सांगून  जिल्हा विभाजनाचा निर्णय घेताना संगमनेर  जिल्हा कृति-समितीला विश्वासात घेऊनच जिल्हा मुख्यालयाबाबत  निर्णय घेतला  जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संगमनेर जिल्हा कृति- समितीच्या  शिष्टमंडळाला दिले.

नगर जिल्ह्याचे विभाजन केल्यास उत्तर नगर जिल्ह्याच्या मुख्यालयाचे केंद्र संगमनेर करावे, यासाठी संगमनेर जिल्हा कृति- समितीने गेले चार महिने विविध मार्गाने आंदोलन केले. यासाठी  सह्यांची मोहीम राबविली.45 दिवस साखळी उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत काल (दि.17) मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृति- समितीच्या शिष्टमंडळाला मुंबईत आमंत्रित केले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि  कृति-समिती सदस्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पाऊण तास  समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राजेश चौधरी, अमोल खताळ, राजेंद्र देशमुख, शरद थोरात, प्रशांत वामन, अशोक सातपुते,शाम कर्पे, संदेश उमप, गणेश बोर्‍हाडे, निखिल पापडेजा, किरण घोटेकर, विवेक भिडे, नीलिमा घाडगे उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्हा विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे नागरिकांना सोयीसुविधांसाठी त्रास सहन करावा लागतो. प्रशासनावरही ताण पडतो. त्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे धोरण आहे.  जिल्हा कृती समितीने संगमनेर जिल्हा होण्यासाठी दिलेला प्रस्ताव व त्यात जिल्ह्यासाठी लागणार्‍या सर्व सोयी-सुविधांचा आकर्षक असा अहवाल व डेमो या सर्वांची दखल घेऊन  निर्णय घेऊ, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगमनेर जिल्हा कृति- समितीला  उपोषण सोडण्याची विनंती  केली.