होमपेज › Ahamadnagar › टाकळीत महिलांचा हंडा, लाटणे मोर्चा

टाकळीत महिलांचा हंडा, लाटणे मोर्चा

Published On: May 09 2018 1:52AM | Last Updated: May 08 2018 11:38PMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावातील बांडेवस्ती, पायमोडेवस्ती व गावठाणास पाणी मिळत नसल्याने काल (दि.8) सकाळी साडेनऊ वाजता संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा व लाटणे मोर्चा काढून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला. तसेच सुमारे दीड तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ढोल-ताशाच्या निनादात आंदोलन केले.यावेळी बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सरपंच सुनीता झावरे, ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी महिलांना दोन दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास पुन्हा ग्रामपंचायती समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलक महिलांनी दिला.

टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या अंजनाबाई विश्वनाथ बांडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हा मोर्चा काढला. ग्रा. पं. सदस्या चित्रा संतोष बांडे, कचरा बांडे, अंजूबाई शिंदे, शारदा बांडे, लहूबाई बांडे, आशा बांडे, विजया झावरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी संतप्त महिलांनी ग्रामविकास अधिकारी दातीर यांना धारेवर धरत दहा-दहा दिवस गावाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. बांडेवस्ती, पायमोडेवस्ती, बेटवस्ती या भागास साहेबटोक येथील पिण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. आजच्या आज पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा अंजना बांडे यांनी घेतला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे, माजी सरपंच शिवाजी खिलारी, रामभाऊ फराळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीने काळू धरणातून गेल्या वर्षी 29 लाख रुपये खर्च करून पर्यायी पाणीपुरवठा योजना आणली. परंतु या योजनेतून गावाला टिपकाभर पाणी मिळाले नाही. त्यामुळे योजनेवर 29 लाख रुपयांचा खर्च वाया गेला आहे, अशी टीका बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी यावेळी केली.

जुनी योजना दुरुस्त करू : सरपंच झावरे

टाकळी ढोकेश्वर गावाला पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना ही जुनी झाली आहे. त्यामुळे तीन ठिकाणी जलवाहिनी फुटली असून, गावाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. ही पाणी योजना तातडीने दुरुस्त करून किंवा तातडीने टँकरचा प्रस्ताव पाठवू, अशी माहिती सरपंच सुनीता झावरे यांनी यावेळी दिली.