Sat, Apr 20, 2019 08:21होमपेज › Ahamadnagar › नराधमांना मृत्युदंडाचीच शिक्षा द्या

नराधमांना मृत्युदंडाचीच शिक्षा द्या

Published On: Jan 19 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 10:53PMनाशिक/नगर : प्रतिनिधी

सोनई येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविलेल्या सहा जणांना उद्या (दि.20) शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. सर्व आरोपींनी कट रचून थंड डोक्याने तीन तरुणांचा निर्घृण खून केला. आसुरी आनंद मिळाल्यागत हे कृत्य केले. आरोपींचेे हे हिंसक कृत्य बघून रामायणातील राक्षसदेखील या भूतलावर सैतानरूपी मानवाच्या रूपात जन्म घेऊ शकतात, यावर विश्‍वास बसू लागला आहे. त्यामुळे या राक्षसांना मृत्युदंडांची शिक्षाच योग्य ठरेल, असा युक्‍तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे दरंदले वस्तीवर आंतरजातीय प्रेमप्रकरणातून आरोपींनी 1 जानेवारी 2013 रोजी सचिन सोहनलाल घारू (23) याच्यासह त्याचे मित्र राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे (26) आणि संदीप राजू थनवार (24) या तीन युवकांची निर्घृण हत्या (ऑनर किलिंग) करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.15) झालेल्या सुनावणीत पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदीप माधव कुर्‍हे आणि अशोक सुधाकर नवगिरे या सहाजणांना दोषी ठरविले होते. तर अशोक रोहिदास फलके याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्‍तता केली.

दोषी ठरविलेल्या सहाजणांच्या शिक्षेवर काल (दि.18) नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्यासमोर युक्‍तिवाद झाला. आरोपींना कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. आरोपींमध्ये एक तरुण असून, काही आरोपी वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाचा अंदाज घेत शिक्षा द्यावी, असा युक्‍तिवाद त्यांनी केला.  त्यानंतर विशेष सरकारी वकील निकम यांनी सुमारे दीड तास युक्‍तिवाद केला. आरोपींनी कटकारस्थान रचून तिघाही युवकांचा निर्घृण खून केला. अत्यंत थंड डोक्याने संगनमत करून हत्या केल्या. केवळ एवढ्यावरच न थांबता मृतदेहांचे तुकडे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल केली.

आरोपींनी 1 जानेवारी 2013 ला दुपारी 3.30 ते रात्री 8 पर्यंत तिघांचीही हत्या करण्याबरोबरच पुरावेदेखील नष्ट केले. आसुरी आनंद मिळाल्यागत त्यांनी हे कृत्य केले. या कृत्याचा आरोपींना कोणताही पश्‍चाताप नसून, त्यांनी तसे वर्तनही केलेले नाही. शिवाय आरोपींना जात-पात, वय नसते. त्यामुळे त्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी, असेही अ‍ॅड. निकम यांनी सांगितले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील विविध खटल्यांचे दाखलेही अ‍ॅड. निकम यांनी यावेळी दिले. 
सुनावणीच्या वेळी न्यायालयात निकाल ऐकण्यासाठी वकिलांनी गर्दी केली होती. तसेच खबरदारी म्हणून न्यायालयीन परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

इंदिरा गांधी हत्याकांडाच्या निकालाचा संदर्भ

आरोपींच्या वतीने युक्‍तिवाद करताना वकिलांनी सर्वच आरोपी हत्याकांडात सहभागी नव्हते, काही कटात सहभागी होते, असे सांगितले होते. त्यावर उत्तर देताना अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या खटल्यांचे संदर्भ दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या वेळी आरोपी केहेरसिंग घटनास्थळावर हजर नव्हता, मात्र कटात सहभागी होता. त्यामुळे न्यायालयाने त्यालादेखील फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचप्रमाणे तिहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीच द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. निकम यांनी केली.