Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Ahamadnagar › तिहेरी अपघातात ५ ठार,१ गंभीर

तिहेरी अपघातात ५ ठार,१ गंभीर

Published On: Dec 15 2017 2:42AM | Last Updated: Dec 14 2017 11:20PM

बुकमार्क करा

बेलापूर : वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रूक ते नरसाळी दरम्यान बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान  टँकर, स्विफ्ट डिझायर आणि टाटा व्हिस्टा या वाहनांच्या तिहेरी अपघातात स्विफ्ट कारमधील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मरण पावलेले सर्व तरुण श्रीरामपूर परिसरातील आहेत.

सचिन रघुनाथ तुपे (29, रा.भैरवनाथनगर, गोंधवणी), भारत विश्‍वनाथ मापारी (28, रा. गोंधवणी), शिवाजी   झुंबरनाथ ढोकचौळे (27, रा. रांजणखोल), सुभाष बाळासाहेब शिंदे (28, रा. ब्राम्हणगाव वेताळ), नितीन सुधाकर सोनवणे (29, रा.रांजणखोल) अशी या अपघातात मृत पावलेल्या तरूणांची नावे आहेत. तर पियुष धनशाम पांडे हा गंभीर जखमी झाला आहे. 

देवळाली प्रवरा नजिकच्या एका हॉटेलमध्ये मित्राच्या वाढदिवसाची पार्टी  करून स्विफ्ट कारमधील सर्व तरुण दत्तनगरकडे यायला निघाले होते. मात्र, रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. हे सहाजण स्विफ्ट डिझायर (क्र.एम.एच.17-ए.सी.9009) कारमधून देवळाली प्रवराकडून श्रीरामपूरकडे येत होते. त्याचवेळी टाटा व्हिस्टा इंडिका कारही (क्र.एम.एच.17-ए, ई. 6055) श्रीरामपूरकडे येत  होती. एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात या दोन्ही कारमध्ये अपघात होऊन भरधाव वेगातील स्विफ्ट कार समोरून येणार्‍या दुधाच्या टँकर (क्र.एम.एच. 04-जी.आर.9666) वर आदळून रस्त्याच्या बाजूला शेतात फेकली गेली. 

बेलापूर खुर्द-नरसाळी दरम्यान वरधान लिंग महादेव मंदिराजवळ ही घटना घडली. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला त्यांना शेतात फेकली गेलेली स्विफ्ट कार अंधारात  दिसली नाही. टँकरसमोर उभ्या असलेल्या व्हिस्टा इंडिकाकडे पाहून अपघाताची तीव्रता वाटली नाही. नंतर शेतातील स्विफ्ट कार पाहिल्यावर काहींनी बेलापूर पोलिस औट पोस्टला फोनवरुन अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच हवालदार अतुल लोटके, कर्मचारी गणेश भिंगारदे, अर्जून पोकळे, राहुल सोळुंके, बाळासाहेब गुंजाळ हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही मिनिटांतच तेथे पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या. कार पोलिसांनी टँकरला साखळी लावून ओढून काढली.

आणि दरवाजे तोडून या जखमी तरुणांना तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. मात्र, उपचारापूर्वीच पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर गंभीर झालेल्या एकास नगर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर टाटा व्हिस्टा इंडिका कारमध्ये कोणीही नव्हते. ते घाबरून निघून गेले असावेत. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक नितेश राऊत यांच्यासह अन्य डझनभर पोलिस कर्मचारी रात्री घटनास्थळी आले होते. तसेच पोलिस उपाधीक्षक अरुण जगताप, शहर पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनीही अपघातस्थळी भेट देऊन माहिती घेतली.

स्थानिक नागरिक रामदास बडधे, शरद हुरे, गोरख हुरे, भास्कर हुरे, गणेश महाडिक, किशोर महाडिक, विलास क्षीरसागर, चंद्रकांत पुजारी, राधु शिंदे आदींनी यावेळी   चोहोबाजूंनी चेपलेल्या स्विफ्ट कारमधून जखमींना बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली. मयत तरूणांवर काल(दि.14) दुपारी शोकाकुल वातावरणात रांजणखोल व भैरवनाथनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातासंदर्भात पोलिस उपअधीक्षक अरुण जगताप, शहर पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बेलापूर पोलिस करीत आहेत.