होमपेज › Ahamadnagar › झाडांचे पालकत्व स्वीकारणारा शिक्षक 

झाडांचे पालकत्व स्वीकारणारा शिक्षक 

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 11:53PMशिरगाव : बद्रीनारायण लेंडगुळे 

शिक्षकांना मुलांवर संस्कार, माया करताना आपण नेहमी पाहतो; परंतु आपल्या मुलांप्रमाणे निसर्गातील पक्षांवर आणि  झाडांझुडुपांवर मुलांइतकेच प्रेम करणारा शिक्षक पाहणे हे जरा दुर्मिळच असते. परंतु याला अपवाद ठरले आहेत ते शिरगाव येथील शारदाश्रम आश्रम  शाळेतील निसर्गप्रेमी शिक्षक मच्छिंद्र भगवान कापरे. 

कापरे हे शिरगाव येथे गेल्या 20 वर्षांपासून अध्यापनाचे काम करतात. त्यांना ज्ञानदानाबरोबरच निसर्गसंर्वधनाची आवड आहे. याच आवडीतून त्यांनी देहूरोडजवळील डोंगरावर सुमारे 130 झाडे लावून त्यांना रोज सायकलवर प्रसंगी डोक्यावर पाणी नेत सर्व झाडांचे जणू पालकत्वच स्वीकारले आहे. कापरे यांनी घोरावडेश्वराच्या डोंगरावर नागेश्वर मंदिर परिसरात मागील वर्षी स्वखर्चातून वड, पिंपळ,बदाम, कडुलिंब, चिंच, आंबा अशी 25 झाडे लावली. या रोपट्यांची वर्षभर मुलांप्रमाणे जोपासना केली. आज ही झाडे चांगल्या प्रकारे वाढली आहेत. या झाडांना पाणी घालण्यासाठी जाताना कापरे हे तेथील पक्ष्यांना  बाजरी, तांदूळ असे धान्य घेवून जातात.  या परिसरात कापरे दिसताच तेथील चिमण्या चिवचिवाट करायला लागतात. आपण निसर्गाचेही काही देणे लागतो, या जाणीवेतून मी नेहमी असे काम करत असल्याचे कापरे सांगतात.

 या  रोपट्यांची वाढ पाहून कापरे यांनी यावर्षी याच परिसरात आणखी 125 रोपट्यांची लागण केली. ते या रोपट्यांना दिवसाआड पाणी घालून सांभाळत आहेत.  त्यांची धडपड पाहून सोमाटणे येथील साई नर्सरीच्या मालकांनी त्यांना वृक्ष रोपटी मोफत दिली; तसेच  देहूरोड येथील लष्कारातील पाटील आणि चौगुले यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली.  त्यामुळे कापरे यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. आता पुढील वर्षी आणखी जास्त झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे हे सर्व उजाड माळरान आता वृक्षसंपदेने तसेच पक्ष्यांच्या चिवचिवाटाने फुलू लागले आहे. प्रत्येक काम मनापासून केल्यास त्याचे फळ नक्की मिळते; तसेच त्या कामापासून मिळनारे  समाधान हे शब्दात मांडता येत नसल्याचे कापरे सांगतात. त्यांना या कामात मेजर गावली, पाटील, विकास थोरात व चौगुले आदी सहकारी मनापासून सहकार्य करतात.  

निसर्गसंपदा जपणे गरजेचे 

सध्याच्या  शहरीकरणामुळे भोवतालच्या परिसरातील वनराई नष्ट होत असून, क्राँक्रिटचे जंगल  वेगाने वाढते आहे; परंतु त्याचे दुष्परिणाम नष्ट करण्यासाठी निसर्गसंपदा जपणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणीही वैयक्तिक प्रयत्न करताना दिसत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात तसेच भोवतालच्या उजाड डोंगरावरांवर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे महत्वाचे आहे;  परंतु दुर्दैवाने कोणीही याकडे लक्ष देत नाही. एखाद्या शुभकार्यात संबंधितांना महागडी वस्तू देण्यापेक्षा रोपटे भेट द्यावे, जेणेकरून केवळ बोलण्यापेक्षा संबंधित व्यक्ती निसर्गसंर्वधनासाठी निश्‍चित प्रयत्न करेल. माझ्या या उपक्रमाची लोकचळवळ झाल्यास सभोवतालचे उजाड डोंगर लवकरच हिरवागार होतील, असे मच्छिंद्र कापरे म्हणाले.