Sun, Jul 21, 2019 08:35होमपेज › Ahamadnagar › कर्जतकरांनी आता वाहतूक शिस्तीचे धडे गिरवण्याची गरज

कर्जतकरांनी आता वाहतूक शिस्तीचे धडे गिरवण्याची गरज

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 11:07PMकर्जत : गणेश जेवरे

कर्जत आता बदलत आहे. पूर्वीचे गाव आता नगरपंचायतीमुळे शहर झाले आहे. पालिकेत काही गावांचा समावेश झाला आहे. गावपण मागे पडत असून, शहराच्या दिशेने वाटचाल होत आहे. मात्र, आजही कर्जतकर आपल्या पूर्वीचे कर्जत गावाच्याच थाटात आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात, याची त्यांना जाणीव होताना दिसत नाही. सार्वजनिक जीवनामध्ये स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे. नाहीतर एकदा का शहाराला बकालपण आले तर मात्र शहराचा विकास आणि विस्तारीकरण हे दोन्ही थांबेल.

वाहतूक कोंडी नित्याची बाब

कर्जतचे शहरीकरण झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्जत-नगर रस्त्यावर सतत होणारी वाहतुकीची कोंडी होय. शहरात वाहनाच्या रांगा दिसतात, तसाच प्रकार येथे नित्याचा झाला आहे. येथे असणारा हा मुख्य रस्ता तसा 8 मीटर रुंद आहे. तरीही वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी बाहेरील वाहने किंवा व्यक्ती येवून करत नाहीत, तर ती आपणच स्थानिक नागरिक करीत आहोत, हे कोणीच लक्षात घेत नाही. या कोंडीचे मुख्य कारण बेशिस्तपणे उभी करण्यात येणारी वाहपे हेच होय. अनेकजण रस्त्याच्या मध्येच वाहने उभी करतात. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या वाहनांची अडचण होते व वाढत्या वाहन संख्येमुळे लगेचच कोंडी होते.

कोणाच्या तरी बेशिस्त वागण्यामुळे त्याचा त्रास अनेकांना होतो. कर्जत शहरात मुख्य रस्ता मोठा आहे. येथे वाहने उभी करताना प्रत्येकाने वाहन रस्त्याच्या कडेला लावले किंवा वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, आमच्याकडे गाडी कडेला उभा करणे हा अपमान आहे असे समजणारे अनेक महाभाग आहेत. त्यांना रस्त्यावरच वाहने लावण्यात अभिमान वाटतो. स्वयंम शिस्त लावून घेण्याची गरज आहे

पूर्णवेळ वाहतूक पोलिसाची गरज

कर्जत शहराची लोकसंख्या व वाहनांची वाढत चाललेली संख्या व इतर कारणे पाहिली तर शहराच्या या मुख्य रस्त्यावर वाहने उभे राहू देवू नयेत, यासाठी परिसरामध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वाहनतळ उभारण्याची गरज आहे.तसेच बसस्थानक परिसरामध्ये चौक असल्याने येथे पूर्णवेळ वाहतूक पोलिस नेमण्याची गरज आहे. केवळ आठवडे बाजारच्या दिवशी या मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी वाहतूक पोलिस ठेवले जातात, मात्र आता पूर्णवेळ पोलिस कर्मचारी नेमण्याची गरज आहे. वाहनतळासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे जर तिथे वाहने उभी राहिली तर कोंडी होणार नाही.

मुख्य रस्त्यालगत असणारे विक्रेते यांच्यावर पालिकेने नुकतीच कारवाई केली, मात्र ही कारवाई करून वाहतुकीचा अडथळा दूर होणार नाही, यासाठी या विक्रेत्यांना पर्यायी जागा देवून किंवा त्यांची जागा निश्‍चित करून त्यांना विक्रीसाठी बसवावे तरच हा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे. 

व्यापार्‍यांची जबाबदारी मोठी

कर्जत शहराचा मुख्य रस्ता मोठा आहे. त्या तुलनेत शहरातील पालिकेचा रोड किंवा बाजारतळ परिसराचे रस्ते फारच अरूंद आहेत. मात्र, या सर्व ठिकाणी वाहनामुळे सतत कोंडी होते. यामुळे या सर्व रस्त्याच्या कडेला ज्या व्यापार्‍यांची दुकाने आहेत यांनी आपल्या किंवा शेजारच्या दुकानामध्ये जर रस्त्याच्या मध्येच गाडी लावून कोणी ग्राहक आले तर त्याला गाडी व्यवस्थित कडेला लावण्याच्या सूचना देण्याचे धाडस दाखवावे लागणार आहे. जर व्यापारी गप्प बसले तर रस्ते लहान आहेत अशी ओरड होवून व्यापार्‍यांची दुकाने काढण्याचा निर्णय प्रशासन घेईल. यामुळे व्यापार्‍यांनी  हा धोका ओळखून आपल्या समोर वाहने लावून देताना काळजी घेण्याची गरज आहे.