Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Ahamadnagar › अंधांना हवाय साई समाधी स्पर्श!

अंधांना हवाय साई समाधी स्पर्श!

Published On: Jan 31 2018 11:48PM | Last Updated: Jan 31 2018 11:24PMशिर्डी : प्रतिनिधी

साई समाधीवर लावलेल्या काचेमुळे नाशिक येथील दृष्टीहिनांना स्पर्शाने समाधीचे दर्शन घेता न आल्याने त्यांनी साई संस्थांच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.  नाशिक शहरातून गेल्या पाच वर्षापासून ओमसाई दृष्टीहिन मित्र मंडळाच्यावतीने सुमारे 35 ते 40 दृष्टीहिनांची साई पालखी निघत असते. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही पालखी शिर्डीकडे निघाली होती. अंधाची पालखीला दिशा देण्याचे काम त्यांच्यासोबत असणार्‍या डिजेच्या गाण्याने दिला होता.

दुसर्‍या दिवशी त्यांनी सिन्नर येथे मुक्काम केला होता. तर तिसर्‍या दिवशी वारी येथे मुक्काम झाला होता. सिन्नरचे आमदार राजेंद्र वाजे यांनी त्यांच्या प्रसादाची व्यवस्था केली होती. रविवारी पालखीत अंध शिर्डीत पोहचले. त्यांना संस्थानच्यावतीने साई आश्रममध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर काल माध्यान्ह आरती झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भाऊ शिरगांवकर यांनी पुढाकार घेवून त्यांना समाधी मंदिरात नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना ज्येष्ठ नागरीकांच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश देण्यात आला होता. मात्र ज्यावेळी त्यांनी समाधीवर असलेल्या काचेस हात लावला तेव्हा  त्यांना समाधी नव्हे काच असल्याचे जाणवले. स्पर्शातून अंधांना ज्ञान होत असते. त्यामुळे त्यांना साई समाधी दर्शनाचा लाभ त्यांना मिळाला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता तेथील प्रशासनाने आम्हाला विटेला हात लावून दर्शन घडवून दिले असल्याचेही या अंध बांधवांनी सांगितले. त्या दर्शनाचे त्यांना आजही सामर्थ्य आहे. 
ग्रामस्थांनी वेळोवेळी समाधी काच काढण्याची मागणी केलेली आहे. मात्र प्रशासन हे ऐकण्यास काही तयार नाही. यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. परंतु साईबाबा संस्थानने याकडे दुर्लक्ष केले होते. अंध मुलांच्या नाराजीमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला असून आता ग्रामस्थांच्या भूमिककडे लक्ष  आहे.