होमपेज › Ahamadnagar › थिमपार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्या उद्घाटन 

थिमपार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्या उद्घाटन 

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:31AMशिर्डी : प्रतिनिधी 

साईबाबांचे जीवन चरित्र, त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश जनमान्यांपर्यंत पोहोचवता यावा, साईबाबांच्या पावन समाधीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून शिर्डीत येणार्‍या भाविकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने मालपाणी उद्योग समुहाने शिर्डीत ‘साईतीर्थ’ या थिमपार्कची निर्मिती केली आहे. याचे उद्घाटन रविवार दि. 8 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली.शिर्डीतील साईतीर्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मालपाणी उद्योग समुहाचे संचालक राजेश मालपाणी, संजय मालपाणी आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

याबाबत माहिती देताना मालपाणी म्हणाले, वेट एन जॉय वॉटरपार्कला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर मालपाणी उद्योग समुहाने शिर्डीत येणार्‍या भाविकांसाठी श्री साईबाबांच्या अलौकिक जीवन चरित्राची प्रत्यक्ष अनुभूती देणार्‍या थिमपार्कची निर्मिती केली आहे. रविवारी त्याचा उद्घाटन सोहळा होत असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खा. सदाशिव लोखंडे व खा.दिलीप गांधी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारा हा थिमपार्क असेल. साईबाबांनी ज्या द्वारकामाईची वास्तू आपल्या सानिध्याने पवित्र केली. त्या द्वारकामाईची प्रतिकृती साईतीर्थमध्ये उभारण्यात आली आहे. लंडनच्या विश्वविख्यात कंपनीकडून रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले साईबाबा व त्यांच्या भक्तांचे हुबेहूब हलते-बोलते पुतळे द्वारकामाईला जिवंत करणार आहेत. 

72 फुटी भव्य रुपेरी पडद्यावर साकरण्यात आलेला ‘सबका मालिका एक’ हा चित्रपट साईबाबांच्या भक्तांना 100 वर्षे जुन्या शिर्डीचे दर्शन घडवित खंडोबा, गुरूस्थान, द्वारकामाई, चावडी आदी ठिकाणी घडलेल्या बाबांच्या दैवी लीलांची अनुभूती देणार आहे, अशी माहिती राजेश मालपाणी यांनी दिली.

याशिवाय भारतातील प्रमुख दहा तीर्थस्थळांची इलेक्ट्रॉनिक्सवर चालणार्‍या बोटीतून सफर करण्याचा आनंद ‘टेम्पल राईड’ या आकर्षणातून घडणार आहे. वादळ वारा, पाऊस, विजांचा कडकडाट आणि प्रचंड अग्नितांडवाचा अनुभव देणारा, हनुमानाच्या समुद्र उड्डाणापासून ते लंका दहनापर्यंतचा प्रसंग ‘5 डी’ इफेक्टसह थरथरत्या प्रेक्षागृहात पाहणे हा देखील एक अद्भूत अनुभव असणार आहे.   

उद्घाटनानंतर 9 तारखेपासून भाविकांसाठी खुल्या होणार्‍या साईतीर्थ थिमपार्कचा अनुभव भाविकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ.संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी यांनी आवाहन केले आहे.

 

Tags : Shirdi, Shirdi news, themepark, inauguration,