Mon, Mar 18, 2019 19:26होमपेज › Ahamadnagar › आज नगर बंदची हाक

आज नगर बंदची हाक

Published On: Jul 25 2018 1:36AM | Last Updated: Jul 24 2018 11:07PMनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र बंदला काल (दि. 24) जिल्ह्यातील काही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज (दि. 25) नगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. ‘सकल मराठा समाजा’च्यावतीने व्यावसायिक, विविध संस्थांना बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयात जाण्याऐवजी घरी थांबून बंदमध्ये सहभाग घेण्याची भूमिका विद्यार्थी संघटनांनी जाहीर केली आहे. 

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलन प्रसंगी कायगाव टोका येथे सोमवारी काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतली. काल (दि.24) हुतात्मा स्मारक येथे शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दुदैवी घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन तीव्र झाले आहे. नगर येथील सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज (दि.25) शहर बंद व रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सकल मराठा समाजाने बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. शहर व परिसरातील लेखी निवेदन देऊन शाळा, महाविद्यालयांना बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.  

मराठा आरक्षण व इतर विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने आज नगर शहर बंदची हाक दिली आहे. यावेळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. नगर शहरातून बाहेर जाणार्‍या सर्व रस्त्यांवर आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे एसटी महामंडळाचे आगारातून बस न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. 

शहरातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी ‘फिक्स पॉईंट’ देण्यात आले आहेत. शहरात बंदोबस्तासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातून बाहेर जाणारी वाहतूक विस्कळीत होणार आहे. त्यातून अनेक प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. 
विद्यार्थ्यांनी सलग 8 दिवस घरी थांबावे

विद्यार्थ्यांनी 2 ऑगस्टपर्यंत घरी थांबून बंदमध्ये सहभाग नोंदवावा. रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलनात सहभाग घेतल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी 8 दिवस घरीच थांबून विद्यार्थ्यांनी बंदमध्ये सहभाग घ्यावा. शाळा, महाविद्यालयांना निवेदन देऊन त्यांनाही आवाहन करण्यात आले आहे.

- यशवंत तोडमल (राज्य समन्वयक, स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटना)