Sat, Jul 20, 2019 15:27होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांना पाठविणार आज भेसळयुक्‍त दूध!

मुख्यमंत्र्यांना पाठविणार आज भेसळयुक्‍त दूध!

Published On: Jun 05 2018 1:15AM | Last Updated: Jun 04 2018 11:58PMनगर : प्रतिनिधी

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या आज (दि.5) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध पाठविण्यात येणार आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

शेत मालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. त्यात जोडधंदा असलेल्या दूधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात निर्सगाने दिलेल्या दगा फटक्याने अधिक भर पडल्याने शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. अशी परिस्थिती असताना सरकारने पाकिस्तानची साखर आयात केल्याने देशातील साखरेचे भाव गडगडले आहे. देशातील तूर सरकारने घेतले नाही. मात्र, मोझांबिक देशातून तूर घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तर शेतकर्‍यांच्या दूधाला कमी भाव मिळत असून, एका लिटरचे तीन लिटर भेसळयुक्त दूध बनविण्याचे पाप डेअरी व दूधसंघ करीत आहे. याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. 

शेतकर्‍यांनी दूधाच्या भावासाठी उभे केलेले आंदोलन रास्त असून, सरकारचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध पाठविण्यात येणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी म्हटले आहे. या आंदोलनात अ‍ॅड.गवळी, अशोक सब्बन, कॉ.बाबा आरगडे, अशोक वाकचौरे, सुधीर भद्रे, कैलास पटारे आदी  सहभागी होणार आहे. शेतकर्‍यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.