नगर : प्रतिनिधी
भक्तिभावाने गेल्या दहा दिवसांपासून सेवा केलेल्या गणरायाला अकराव्या दिवशी गुरुवारी (दि. 12) नगरकर निरोप देणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळ व पोलिस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी केली आहे.
मागील वर्षी पोलिसांनी मिरवणुकीत येण्यापूर्वीच ‘डीजे’ जप्त केल्याने काही मंडळांनी मिरवणुकीत बहिष्कार टाकला होता. यापूर्वीही पोलिसांची भूमिका कायम राहणार आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्यातच गणरायाला निरोप दिला जाणार आहे.
सकाळी मानाच्या विशाल गणपती मंदिरातील गणेशमूर्तीची उत्थापन पूजा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते होईल. त्यानंतर शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होईल. रामचंद्र खुंट येथून आडतेबाजार, दाळमंडई, तेलीखुंट, कापड बाजार, अर्बन बँक रस्ता, नवीपेठ, खामकर चौक, नेताजी सुभाष चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट मार्गे नेप्ती नाक्याजवळील बाळाजी बुवा विहिरीजवळ मिरवणुकीची सांगता होईल. बाळाजी बुवा विहिरीत मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मिरवणूक मार्गाला जोडणारे रस्ते बॅरेकेटिंग लावून बंद करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दोनशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे कंट्रोल रुममध्ये प्रत्येक चौकातील हालचाली पोलिसांना कळणार आहेत. शहरातील मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी एक पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकातील कर्मचार्यांवर एका मंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मिरवणुकीसाठी 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे.