नगर : प्रतिनिधी
पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला प्रकरणातील भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल (दि. 23) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यावर मंगळवारी न्यायालयाकडून निर्णय दिले जाण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भिलारे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आ. कर्डिले यांच्यासह अॅड. प्रसन्न जोशी, अॅड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ, अलका मुंदडा या पाच जणांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आरोपींच्यावतीने युक्तिवाद करताना अॅड. नितीन गवारे म्हणाले की, पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यातील भारतीय दंड विधानाचे कलम 308 व कलम 225 हे चुकीच्या पद्धतीने नोंदविलेले आहे.
त्या गुन्ह्याची व्याख्या फिर्यादीत नमूद नसतानाही जाणूनबुजून ही कलमे वाढविण्यात आलेली आहेत. जमावाच्या हल्ल्यात पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराची काच तुटलेली आहे. फिर्यादी पोलिस कर्मचार्याला झालेली जखम नेमकी कोणी केलेली आहे, हे स्पष्ट केलेले नाही. आ. कर्डिले यांना अटक करण्यात आलेली नाही, तर ते स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झालेले आहेत. त्यामुळे पाचही जणांना जामीन मंजूर करावा.
सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. केदार केसकर म्हणाले की, ‘आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. इतर फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. पोलिसांचा तपास अजून सुरू आहे. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करू नये.’ दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात जामीन अर्जावर मंगळवारी (दि. 24) निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Tags : ahamadnagar, ahamadnagar news, Shivaji Kardile, bail decision,