Sun, Jul 21, 2019 16:25
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › घरकुल योजना पूर्ण करणे हिच माझी वारी : सुनीताताई गडाख

घरकुल योजना पूर्ण करणे हिच माझी वारी : सुनीताताई गडाख

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:55PMनेवासा : प्रतिनिधी

नेवासा तालुक्यात अनेकांना राहायला घरच नाही. हाच मूलभूत प्रश्‍न डोळ्यांसमोर ठेवून वर्षभरात सर्वच गरजूंना पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. ही योजना पंढरीची आषाढी वारी समजूनच पूर्ण केली जाईल, असा दृढविश्वास पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाख यांनी व्यक्त केला.

सोनई जिल्हा परिषद गटात मंजूर झालेल्या व काम सुरू असलेल्या घरकुलांबाबत यशवंतनगर (वंजारवाडी) येथे आयोजित आढावा बैठकीत सभापती गडाख बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच सुधामती दराडे होत्या. गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, अंबादास राऊत, नानासाहेब दराडे, महादेव दराडे, सुनंदा दराडे, सुनील वाघ, ऋषीकेश निमसे उपस्थित होते. तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतून 1 हजार 84, तर रमाई योजनेतून 675 घरकुलांना या वर्षी मंजुरी देण्यात आली. माजी आ. शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात जास्तीत जास्त घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. 

हे काम करताना कुणाही लाभार्थ्यांला चकरा न मारता वेळोवेळी निधी उपलब्ध केला जाईल, असेही गडाख यांनी सांगितले. गटविकास अधिकारी मुंढे, युवा कार्यकर्ते सुभाष राख यांची भाषणे झाली. सभापती व उपसभापतींनी यशवंतनगर येथे काम सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी केली. 14 व्या वित्त आयोगातील सहा लाखांच्या बंदीस्त गटार कामांची पाहणी केली. प्रास्ताविक रमेश घोरपडे यांनी केले.