Thu, Nov 15, 2018 09:34होमपेज › Ahamadnagar › केडगावजवळ तीन विद्यार्थी ठार

केडगावजवळ तीन विद्यार्थी ठार

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 21 2018 12:06AMनगर : प्रतिनिधी

पुण्याहून नगरच्या दिशेने भरधाव येणार्‍या तवेराचा टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून तिने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील तीनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तेवरातील 4 जण जखमी झाले आहेत. नगर-पुणे महामार्गावर केडगाव परिसरातील महामार्ग पोलिस चौकीजवळ शनिवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. 

मृतांमध्ये आकाश उद्धव गुंड (18, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता, नगर), सुमीत शांताराम खामकर (18, रा. येळपणे, हल्ली रा. चिखली, ता. श्रीगोंदा) व निलेश रंगनाथ खेडे (18, रा. निर्मलनगर, भगवान बाबा चौक, नगर) यांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक तवेरा जागेवरच टाकून पसार झाला. तवेरातील जखमींची नावे समजू शकली नाहीत.

न्यू आर्टस् महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी शनिवारी सकाळी 8 ते 11 कॉलेज संपल्यानंतर काही कामानिमित्त पॅशन प्रो कंपनीच्या दुचाकीवरून (क्र. एमएच 16, बीपी 9497) केडगाव येथे चालले होते. यावेळी पुण्याहून नगरच्या दिशेने तवेराचा टायर फुटला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीला जोरात धडकली. यात दुचाकीवरील तीघेही जागीच मृत झाले. कारमधील 3-4 जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्यासह पोलिस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व वाहने रस्त्यावरून बाजूला केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात विठ्ठल आश्रूबा गुंड (57, रा. नवलेनगर, गुलमोहोर रस्ता, नगर) यांच्या फिर्यादीवरून तवेरा गाडीवरील (क्र. एमएच 14, एव्ही 6745) चालकाविरुद्ध तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार हंडाळ हे करीत आहेत.