Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Ahamadnagar › तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू

तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:29PMपौड : वार्ताहर              

चेन्नई येथून उन्हाळी शिबिरासाठी कातरखडक (ता. मुळशी) येथे आलेल्या तीन शाळकरी मुलांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी घडली होती. यातील एक मृतदेह बुधवारी रात्री तर दोन मृतदेह गुरुवारी (दि. 26) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मिळून आले आहेत. उन्हाळी शिबिराच्या पहिल्याच दिवशी कातरखडक तलावावर फिरण्यासाठी गेले असता तिघे जण पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे 13 ते 15 वयोगटातील 20 विद्यार्थी कातरखडक या ठिकाणी उन्हाळी शिबिरासाठी आले होते. शिबिराचा बुधवार हा पहिलाच दिवस होता. शिबिर सायंकाळी संपल्यानंतर हे सर्व जण कातरखडक येथे असलेल्या तलावावर गेले असता तिघे जण पाण्यात उतरले असता बुडाले. 

डॅनिश कलिम अनसारी (वय 14, रा. 59 मेन स्ट्रीट नेताजीनगर, आयओसी, चेन्नई), संतोष गणेश (वय 14, रा.246 नवलरनगर तोडियार पेठ, चेन्नई) आणि सर्वान्ना मुरूगराजा कुमार (वय 14, रा. 915, ई लाईननगर, ए ब्लॉक स्ट्रीट, कोडूनगायर, चेन्नई) असे धरणात बुडालेल्यांची नावे आहेत. यातील डॅनिश याचा मृतदेह बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाहेर काढून पिरंगुट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

दरम्यान बुधवारी रात्री अन्य दोघांचे शोधकार्य थांबवले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा लवकरच शोधकार्यास सुरुवात करण्यात आली असता संतोष आणि सर्वान्ना यांचे मृतदेह दुपारी एक वाजेपर्यंत मिळून आले.  गुरुवारी सकाळी कातरखडक येथील तलावामध्ये शोधकार्य करण्यासाठी एनडीआरएफचे एक पथक, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन आणि मुळशी विकास मंचाचे कार्यकर्ते दोन दिवस सतत प्रयत्न करत होते. यात मुळशी विकासमंचाचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे, आशुतोष देशपांडे, नाना पासलकर, राहुल मालपोटे, प्रकाश महाले, बोट चालक कॅडवीन मेनेजीस यांनी मृतदेह शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी देहूरोड उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, पौडचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे शोधकार्यादरम्यान उपस्थित होते. दरम्यान परराज्यातून मुळशी तालुक्यात शिबिरासाठी आलेल्या छोट्या मुलांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पदाधिकार्‍याच्या मालकीच्या जमिनीमुळे मुळशीत शिबिर 

कातरखडक येथे चेन्नई येथून उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 20 मुलांचे आयोजन टिच फॉर इंडिया या संस्थेने केले होते. या संस्थेतील एका पदाधिकार्‍याची जमीन कातरखडक येथे असल्यामुळे कातरखडक येथील जागेची निवड या उन्हाळी शिबिरासाठी करण्यात आली असल्याची माहिती पुढे येत आहे.

महापालिकेचा जलतरण तलाव उठला जीवावर

भोसरी सहल केंद्रातील जलतरण तालावात बुडून एका 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज गुरुवार दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. सनी बाळासाहेब ढगे (वय 22, रा. भोसरी) असे तलावात बुडालेल्या तरूणाचे नाव आहे.  भोसरी सहलकेंद्रात महापालिकेच्या वतीने जलतरण तलाव बांधण्यात आलेला आहे. या तलावात दुपारी साडेतीनच्या सुमारास सनी पोहण्यासाठी आला असता तो बुडाला. हा प्रकार लक्षात येताच त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. सनी याचा मृतदेह सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर भोसरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.