Sun, Nov 18, 2018 13:25होमपेज › Ahamadnagar › डाळिंब व्यवहारात तीन कोटींची उलाढाल

डाळिंब व्यवहारात तीन कोटींची उलाढाल

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:31PMराहाता : बाळासाहेब सोनवणे

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची डाळिंब खरेदी- विक्रीची महिन्याची उलाढाल 3 कोटी रुपये वर गेली असून  एक नंबर डाळिंब 80 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात असल्याने 8 ते 10 जिल्ह्यांतून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी राहाता बाजार समितीत शेतकरी गर्दी करू लागले आहेत. येथे दररोज डाळिंबाच्या 35 हजार कॅरेटची आवक सुरू आहे. 

राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंब व कांदा खरेदी विक्रीसाठी देशात अव्वल स्थानावर आहे. या बाजार समितीची खरेदी- विक्रीची वर्षाची उलाढाल 500 कोटींच्या पुढे गेली आहे. येथील शेतकर्‍यांचा भाजीपाला व फळे ई- मंढी पद्धतीद्वारे विकला जातो. त्यामुळे खरेदी-विक्री मध्ये पारदर्शीपणा असल्याने आज देशात या बाजार समितीने आपले स्थान अव्वल क्रमांकावर नेले आहे. सध्या डाळिंब या फळ बागेची आवक मोठ्या प्रमाणावर असतानाही राज्यात इतर बाजार समित्यांच्या तुलनेत येथील डाळिंब बाजाराचे भाव चांगल्या दराने आहे. यात एक नंबर क्वॉलिटीचे डाळिंबाचे बाजार प्रतिक्विंटल 50 ते 80 तर दुसर्‍या नंबर क्वालिटीचे मालास 30 ते 40 प्रतिव्किंटल व तिसर्‍या नंबरच्या क्वालिटी मालास 20 ते 25 रुपये प्रमाणे सध्या बाजार भाव आहे. सध्या दररोज 35 ते 40 हजार कॅरेट आवक आहे.

मागील पंधरवाड्यात 53 हजार कॅरेटची आवक प्रत्येक दिवशी होते. नगर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, जालना, बीड या 10 जिल्ह्यातून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आणतात. शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये, म्हणून बाजार समितीने वाहनतळासाठी स्वतंत्र 5 एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांना आपला माल लगेचच विक्रीसाठी सोपा झाला आहे. सकाळी 6 वाजता माल आल्यास सदर मालाचा लिलाव होतो व लगेचच 9 वाजता शेतकर्‍यांना सदर मालाची पट्टी हातात मिळते. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या पट्टीसाटी व्यापार्‍यांकडे हेलपाटे मारण्याची गरज भासत नाही. बाजार समितीने शेतकर्‍यांचा माल चोरी जाऊ नये यासाठी संपूर्ण परिसरात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. 

शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त शनिवार सोडून इतर सर्वच दिवशी डाळिंब,कांदा व इतर मालांची खरेदी-विक्री या ठिकाणी सुरू ठेवली आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शीपणा ठेवण्यासाठी ई- मंडीद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले. संपूर्ण देशात वेबसाईटद्वारे शेतकरी व व्यापारी आपला शेतीमाल कोणत्या भावाने विकला गेला व खरेदी केला गेला, हे घर बसल्या पाहू शकतात. ही संकल्पना नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे व युवा नेते सुजय विखे यांच्या संकल्पनेतून राबविली गेली. शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये समन्वय रहावा, यासाठी बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी बाजार समितीच्या खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शीपणा ठेवल्याने आज या बाजार समितीची ओळख संपूर्ण देशात झाली आहे. यासाठी बाजार समितीचे अध्यययक्ष बापूसाहेब आहेर व त्यांच्या सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. 

दहा जिल्ह्यातून डाळींबाची आवक

ना. राधाकृष्ण विखे पाटील व युवानेते सुजय विखे यांंचे सुचनेप्रमाणे ही बाजार समितीची वाटचाल अत्यंत चांगल्यारीत्या सुरु असल्याने  राहाता बाजार समितीची ओळख आज संपुर्ण देशात आहे. या बाजार समितीचे डाळींब आवक दररोज 35 हजार कॅरेटच्या पुढे आहे. सध्या 80 रुपये प्रति किलो दराने एक नंबरच्या मालाला भाव बाजार समितीने दिलेला आहे. त्यामुळे 10 जिल्ह्यातून आपले डाळींब विक्रीसाठी आणतात. खरेदी- विक्रीमध्ये पारदर्शी पणा असल्याने शेतकर्‍यांना ही बाजार समिती आपली वाटते. सचिव - उद्धव देवकर, कृषी उत्पन्न बाजार समिती, राहाता.