होमपेज › Ahamadnagar › स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून तीन लाख लुटले

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून तीन लाख लुटले

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 1:33AMश्रीगोंदा :  प्रतिनिधी 

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने जळगाव जिल्ह्यातील दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील तीन लाख रुपये लुटण्यात आले. शुक्रवारी दुपारी श्रीगोंदा शहराजवळील घायपातवाडी येथील जंगलात ही घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आचारी म्हणून काम करणारे मनतेजर अली मुजफ्फर अली सय्यद (रा.मोठा भोईवाडा, ता. चोपडा, जि. जळगाव) यांची सहा महिन्यांपूवी चोपडा येथे श्रीगोंदा शहरातील नितीन नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. यावेळी नितीन याने आपल्याला वाड्याचे खोदकाम करताना अर्धा किलो सोने सापडलेले आहे. ते विकायचे असून ते तुम्हाला बाजारभावापेक्षा निम्म्या किंमतीत देतो, असे सांगितले. 

मात्र, सय्यद यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी  बिस्मिला शेख (रा. शिवाजीनगर, उस्मानिया पार्क, जळगाव) यांच्याशी संपर्क साधत नितीनची ओळख करून दिली. नितीनकडे सोने आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी  सय्यद व शेख हे  दोघे 5 एप्रिल रोजी श्रीगोंदा येथे आले होते. सोने असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही पैशाची जमवाजमव करून सोने घेण्यासाठी येतो, असे सांगून ते निघून गेले.

त्यानंतर 2 लाख 90 हजार रूपयांची जुळवाजुळव करत, हे दोघे शुक्रवारी (दि.13) सकाळी अकराच्या सुमारास श्रीगोंदा बसस्थानकावर उतरले. तेथून त्यांनी ज्याच्याकडून सोने घ्यायचे आहे, त्याच्याशी संपर्क साधत आपण आल्याची माहिती दिली. पाच मिनिटांत राजा नावाचा एक दुचाकीस्वार या दोघांना घेण्यासाठी आला. त्यांना सोबत घेऊन तो मांडवगण रस्त्याने अकरा नंबर वितरिकेवर गेला. मात्र, तिथे कुणीही नसल्याने हे तिघे नाश्ता करण्यासाठी पुन्हा श्रीगोंदा येथे आले. त्यानंतर अर्ध्या तासाने लुटारूंनी आम्ही सोने घेऊन आलो असल्याचे सांगितले. 

नाश्ता करून हे तिघे पुन्हा घायपतवाडी येथे गेले. तेथे सात ते आठजण दबा धरून बसले होते. त्यामध्ये एक महिलाही होती.  शेख व सय्यद यांनी त्या लोकांना सोन्याची मागणी केल्यानंतर त्यांनी पितळी पातेले दाखवले. त्यात पिवळ्या धातूच्या अंगठ्या होत्या. परंतु, त्या नकली असल्याचे लक्षात येताच या दोघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, या लुटारूंनी पाठलाग करत त्यांना जबर मारहाण केली. शेख यांच्याकडील 2 लाख 90 हजाराची रक्कम बळजबरीने चोरून नेली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे करत आहेत. 
   

 एक लुटारू सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, सय्यद व शेख यांना श्रीगोंदा बसस्थानकावरुन घायपतवाडी येथे घेऊन जाणारा लुटारू रस्त्याच्या बाजूला असणार्‍या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पोलिसांना त्याच्याविषयी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच सय्यद आणि शेख यांच्याशी संपर्कासाठी वापरलेल्या मोबाईलचे सीमकार्ड आता बंद करण्यात आले असून, ते नाशिक येथील अहिरे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Tags : robbery of gold, with cheap gold,nagar news