होमपेज › Ahamadnagar › इंग्रजीच्या पेपरला झाल्या तीन कॉपीकेस!

इंग्रजीच्या पेपरला झाल्या तीन कॉपीकेस!

Published On: Feb 22 2018 1:26AM | Last Updated: Feb 22 2018 12:10AMनगर : प्रतिनिधी

बारावीच्या पहिल्याच पेपरला जिल्ह्यात तीन विद्यार्थ्यांवर ‘कॉपीकेस’ करण्यात आली. हे तिघेही कॉपीबहाद्दर कर्जत तालुक्यातील आहेत. कॉपीसाठी ‘बीड पॅटर्न’ ठरलेल्या पाथर्डीत भरारी पथकांनी वातावरण ‘टाईट’ केल्याने याठिकाणी कॉपीमुक्त वातावरणात पेपर झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी दिली.

बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 64 हजार परिक्षार्थी होते. राज्याच्या काही भागात इंग्रजीचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला असतांना जिल्ह्यात मात्र अशी घटना आढळून आली नाही. संवेदनशील असलेल्या परीक्षा केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. कॉपी बहाद्दरांवर अंकुश ठेवण्यासाठी 6 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेल्या सहा पथकांनी ठिकठिकाणी महाविद्यालयांना भेटी देत ‘चेकींग’ केले. कर्जतला स्वामी समर्थ महाविद्यालयात एक तर अमरनाथ महाविद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांवर कॉपी केस करण्यात आली.

बारावीसाठी जिल्ह्यात 93 परीक्षा केंद्र आहेत. अवघड विषयांच्या परीक्षेच्या दिवशी परीक्षाकेंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असतात. त्यामुळे इंग्रजीच्या पेपरसाठी उपद्रवी व संवेदनशिल परिक्षा केंद्रांवर बैठे पथक ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात प्रांताधिकारी व तहसिलदारांच्या पथकांनी तपासणी केली.

अनावश्यक नागरिकांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात उपद्रव करू नये यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम 144 अन्वये जमावबंदी जारी करण्यात आली होती. अनेक केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या भरारी पथकांनी जिल्ह्यात फिरत महाविद्यालयांमध्ये तपासणी केली.

‘रिडक्शन’चा धुमाकुळ

इंग्रजीचा पेपर असल्याने कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी रिडक्शनचा वापर केला. रिडक्शनमध्ये पुस्तक, गाईडची छोट्या आकारातील झेरॉक्स कॉपी मिळत असल्याने अनेकांचा त्याकडे कल आहे. पेपर सुरु झाल्यानंतर अनेक झेरॉक्सच्या दुकानांमध्ये रिडक्शन काढण्यासाठी गर्दी दिसून आली. काही ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना इमारतीवर चढून कॉपी पुरवत असल्याचे चित्र होते.