Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Ahamadnagar › ‘निर्भया’ला हजारो जणांची श्रद्धांजली

‘निर्भया’ला हजारो जणांची श्रद्धांजली

Published On: Jul 14 2018 8:08AM | Last Updated: Jul 13 2018 10:42PMकर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयावरील दुर्देवी अत्याचाराच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त कोपर्डीत येथे हजारो जणांच्या उपस्थितीत क्रोध आणि दु:खाचे संमिश्र वातावरण पहावयास मिळाले. सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांमधून अनेक जण कोपर्डीत येत होते. येणारा प्रत्येक जण दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे ओझे मनामध्ये घेऊनच या परिसरात वावरत होता. 
गावामध्ये आजही सर्वत्र त्या घटनेचे पडसाद दिसून येत होते. गावामधील सर्व व्यवहार सुरळीत असले तरी त्यामध्ये एक प्रकारची उदासीनता दिसून येत होती. ज्या कुळधरणमधील नूतन मराठी शाळेत निर्भया शिकली, तेथे आज विद्यार्थिनींमध्ये आपली ताई आपल्यामधून गेल्याची भावना जाणवत होती.गावमध्ये शांतता होती. मात्र या शांततेच्या मागे एक मोठे शल्य दिसून येत होते.

निर्भयाच्या आठवणी जाग्या

कोपर्डीत आल्यावर सर्वांच्या मनामध्ये पुन्हा एकदा निर्भयाच्या आठवणी जाग्या झाल्या. निर्भयाच्या आईने आजही तिच्या आठवणी साश्रू नयनांनी जागवल्या. हंबरडा फोडून त्या म्हणाल्या, इतर मुलींबाबत अशी घटना घडू नये. माझी छकुली आजही मला सर्व मुलींमध्ये दिसते. तिच्या आठवणींमध्ये आमचा दिवस उगवतो आणि मावळतो. निर्भयाचे वडील आज या घटनेला दोन वर्षे झाले तरी नि:शब्दच होते. त्या नराधमांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी, एवढीच भावना त्यांनी व्यक्त केली.  

मनामध्ये क्रोध आणि करूणा

कोपर्डीत राज्यातील विविध भागांमधून आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये क्रोध अणि करूणा होती. प्रत्येकजण आल्यावर क्रोध व्यक्त करीत होता. तसेच निर्भयाच्या स्मृतीस्थळाजवळ जाऊन करुणेमुळे व्याकुळ होत होता. निर्भयाचे स्मृतीस्थळ फुले, हारांनी सजविण्यात आले होते.
गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ह.भ.प माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन झाले. त्यांनी स्त्री जन्माचे स्वागत आणि महत्व सांगताना आईची थोरवी सांगितली. तसेच अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन केले.

मराठी विद्यालयात श्रध्दांजली

ज्या शाळेमध्ये निर्भया शिकत होती, नूतन मराठी शाळेत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी, अशी भावना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य सुर्यभान सुद्रिक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

शेवटच्या श्‍वासापर्यंत संघर्षाची शपथ

या पुढे अशा प्रकारचा अन्याय सहन करणार नाही व कोणावर अन्याय होऊ देणार नाही. निर्भयाला न्याय मिळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करीत राहणार, अशी शपथ सर्वांनी घेतली.