Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Ahamadnagar › विषारी मासेमारी चौकशी समितीचे ताशेरे

विषारी मासेमारी चौकशी समितीचे ताशेरे

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 19 2018 10:36PMराहुरी : रियाज देशमुख

मुळा धरणात विषारी औषधांचा वापर करून होणार्‍या मासेमारीची राज्य सरकारने दखल घेत चौकशी समिती गठित केली होती. समितीने चौकशी अहवालात मुळा पाटबंधारेने मासेमारी कंपनीवर दाखल गुन्ह्यांबाबत ताशेरे ओढताना विषारी मासेमारी थांबविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले.

मुळा धरणात विषारी मासेमारी होत असल्याचे वृत्त ‘पुढारी‘ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर मुळा धरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून 3 जणांवर गुन्हा नोंदविल्यानंतर पाटबंधारेकडूनही अज्ञात इसमावर गुन्हा नोंदविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, मत्स्योद्योग महामंडळ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांसह पाटबंधारकडूनही तातडीने विषारी मासेमारी प्रकरणासंदर्भात दखल घेत ली होती. तात्काळ मुळा धरण परिसरात पाटबंधारे कर्मचार्‍यांसह बंदूकधारी पोलिस तैनात करण्यात आलेे. त्यामुळे विषारी मासेमारी करणार्‍यांसह अवैध कृत्य करणारे मुळा धरण परिसरातून गायब  झाले होते. पाटबंधारेने धरणाच्या पाण्यालगतचे अतिक्रमण  काढण्याची मोहीम सुरू केली. मात्र, पोलिसांसह पाटबंधारकडून पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली. बंदूकधारी पोलिसांसह पाटबंधारने मुळा तट वार्‍यावर सोडून दिल्याने विषारी मासेमारी करणार्‍यांनी कीटकनाशक औषध वापरून धरणातील पाणी दूषित करून मासेमारी पुन्हा सुरू केली. 

याबाबत ‘पुढारी’ने कीटक नाशकाच्या वापराच्या फोटोसह वृत्त प्रकाशित केल्यानंतर पुन्हा पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले. पाटबंधारेने  विषारी औषधाने होत असलेल्या मासेमारीचे खापर धरण भागात मासेमारीचा ठेका घेतलेल्या कंपनीवर फोडले. उपअभियंताा खेडेकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन मासेमारी कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक विवेक देशपांडे, प्रशासकीय अधिकारी युुवराज फिरके, क. मत्स्य पर्यवेक्षक विजय हापसे आदींसह राज्य सरकारने नियुक्त केलेल्या या समितीने सविस्तर माहिती घेतली. तसेच  व्यवस्थापकीय संचालक, राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई व राज्य सरकारला  एक अहवाल सादर केला. 

या अहवालानुसार पाटबंधारेने मासेमारी करणार्‍या कंपनीवर दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत ताशेरे ओढले आहेत. पाटबंधारेकडून पोलिस ठाण्यात विषारी मासेमारी बाबत कोणताही पुरावा देण्यात आला नाही. तसेच पाटबंधारेने गुन्हा दाखल करण्यापूर्वी राज्य मत्स्योद्योग महामंडळ व ठेकेदारांशी कोणतीही चर्चा केली नाही, हे चौकशी समितीला संयुक्तिक वाटले नाही. 24 एप्रिल रोजी मे. ब्रिज फिशरिजने 3 जणांवर विषारी मासेमारीप्रकरणी गुन्हा नोंदविल्या नंतर तत्कालिन शाखा अभियंता शामराव बुुधवंत यांनी अज्ञातांवर विषारी औषधाने पाणी दूषित करीत 10 लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याबाबत गुन्हा नोंदविला. या सर्व प्र्रकरणांची चौकशी करीत असताना समितीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षकांनी विषारी औषधाने मासेमारी करू नये, यासाठी जनजागृती करावी,तसे सूचना फलक लावणे, तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात पाटबंधारेने लगतच्या गावांत ग्रामसभा घेऊन त्यात मासेमारी करणार्‍यांना उपस्थित राहण्याचे सूचित करणे, धरणात ड्रोनसारखे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, तसेच धरणातील पाण्याची वेळोवेळी तपासणी व्हावी आदी सूचना  देण्यात आल्या आहेत. 

प्रशासनाला सहकार्य करण्यास कटिबद्ध 

मुळा धरण परिसरात विषारी औषधांचा वापरासह जिलेटिनच्या सहायाने मासेमारी होत असल्याची माहिती होती. दरम्यान, आमच्या कंपनीकडून सविस्तर माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर आरोपींना पुराव्यासह पोलिस ठाण्यात हजर करून गुन्हा दाखल केला होता. कंपनीने धरणाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय केलेली नाही. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतासह एकत्रितरित्या बैठक घेऊन मुळा धरण सुरक्षिततेबाबत योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन मे. ब्रिज फिशरिज कंपनीचे मुस्ताफा शेख यांनी दिले आहे.