होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ कर्मचार्‍यांवरील कारवाईला आक्षेप!

‘त्या’ कर्मचार्‍यांवरील कारवाईला आक्षेप!

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेल्या हजेरी पत्रकाच्या तपासणीत गैरहजर आढळलेल्या 43 कर्मचार्‍यांची एक दिवसांची ‘बिनपगारी’ करण्यात आली आहे. मनपा कर्मचारी युनियने या कारवाईला आक्षेप घेत सहाय्यक कामगार आयुक्‍तांकडे धाव घेवून मध्यस्थीची मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी 15 मे रोजी मनपाच्या मुख्यालयातील विविध विभागांच्या हजेरी पत्रकाची तपासणी केली होती. यात 59 कर्मचार्‍यांनी हजेरी पत्रकावर सही केलेली नसल्याचे आढळून आले. त्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला आहे. मात्र, सदरचे कर्मचारी त्या दिवशी पूर्णतः गैरहजर होते की उशिरा कामावर रुजू झाले, याची कुठलीही शहानिशा करण्यात आलेली नाही. कामगार कायद्यानुसार 30 दिवसांत तीन वेळा उशिरा आल्यास तीन वेळा लेट मार्क नोंदविणे आवश्यक आहे. तीन वेळा उशिरा आल्यास त्याचा पगार न कापता त्याची एक दिवसाची किरकोळ रजा खतविण्याची तरतूद आहे. असे असतांना कुठलाही विचार न करता कर्मचार्‍यांवर बेकायदेशीर पणे कारवाई करुन त्याला शास्तीची शिक्षाच देण्यात आलेली आहे. उपायुक्‍तांनी कर्मचार्‍यांच्या हजेरीबाबत पत्रक काढून आदेश दिलेले आहेत. सदरचे पत्रक व करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळे या तक्रारीची नोंद घेवून मध्यस्थी करावी, अशी विनंती युनियनकडून करण्यात आली आहे. दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागातील तीन महिला कर्मचार्‍यांवर करण्यात आलेल्या कारवाईवरही कर्मचारी युनियने आक्षेप घेत तक्रार केली आहे.