Thu, Nov 15, 2018 18:28होमपेज › Ahamadnagar › ही शिवसेना नव्हे तर आहे फशिव-सेना : सुवेंद्र गांधी

ही शिवसेना नव्हे तर आहे फशिव-सेना : सुवेंद्र गांधी

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:34AMनगर : प्रतिनिधी

विकासाच्या मुद्द्यावरुन नगरकरांचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना अर्बन बँकेसंदर्भात चर्चा घडवून आणत आहे. बँकेसंदर्भात एवढी सहानुभूती असल्यास आगामी निवडणुकीत आपले पॅनल उभे करुन खुमखूमी दाखवावी, असे आव्हान भाजप नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी शिवसेनेला दिले आहे. शहरात शिवसेना उरलेली नाही, तर फशिव-सेना झालेली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रोफेसर कॉलनीतील गाळेधारक व ठेकेदार यांच्या बैठकीबाबतचे विधान पूर्णतः फसवे आहे. या विषयात कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नसतांना शिवसेनेने ठेकेदाराबरोबर बैठक कशी घेतली? असा सवाल करत ठेकेदाराची निवड पूर्वनियोजीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खा. दिलीप गांधी यांच्या व्यक्ती द्वेषातुन अर्बन बँकेसंदर्भात आरोप केले जात आहेत. विकासाच्या मुद्द्यावर खा. गांधी यांच्यासमोर टिकू न शकल्यामुळे हा कांगावा सुरु आहे.

निवडणुकीत शहर विकासाच्या मुद्द्यावरच चर्चा करावी. अवांतर विषयावर चर्चा करुन मुख्य विषयाला बगल देऊ नये. वैयक्तिक विषयावर न जाता शहर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावे, असे विनंती वजा आव्हानही गांधी यांनी दिले आहे.