Thu, Aug 22, 2019 11:16होमपेज › Ahamadnagar › भाजपच्या विरोधात राज्यात तिसरी आघाडी

भाजपच्या विरोधात राज्यात तिसरी आघाडी

Published On: Jul 17 2018 1:28AM | Last Updated: Jul 16 2018 11:35PMनगर : प्रतिनिधी

वर्षानुवर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चुकांना वैतागलेल्या लोकांनी गेल्या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात मत टाकले. मात्र भाजपही काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या चुका करत आहेत. 4 वर्षात शेतकरी, आरक्षण, बेरोजगारांचे आंदोलन भाजप सरकारने हाणून पाडले. भाजप सरकार विरोधात जनतेत असंतोष असून, भाजपविरोधात राज्यात तिसर्‍या आघाडीची स्थापना करण्यात आल्याची माहिती तिसर्‍या आघाडीचे मुख्य संयोजक हेमंत पाटील यांनी दिली.

पत्रकार परिषदेस रासप (हेमंत पाटील गट) चे राज्य उपाध्यक्ष रोहन सुरवसे- पाटील उपस्थित होते. तिसर्‍या आघाडीसाठी विविध पक्षांना एकत्रित करण्यात येत असून, त्यासाठी 26 जुलै रोजी पुण्यात राज्यातील विविध पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

आघाडीचे नेतृत्व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे करणार आहेत. पुण्यातील बैठकीला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सुरेश माने, इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे गजानन शिरसाठ, ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संजय कोकरे, अवामी विकास पार्टीचे समशेरखान पठाण आदींसह विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हेमंत पाटील हे यासंदर्भात राज्यभर दौरे करत आहेत.

वंचित, उपेक्षित, शेतकरी व सर्वसामान्य वर्गाला भाजप सरकारने झुलवत ठेवले. तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविण्यात येणार आहेत. निवडणुकीत मराठा, धनगर, मुस्लिम, माळी, दलित, वंजारी, मातंग आणि ज्या भागात ज्या जातीचे वर्चस्व आहे त्या जातीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात येणार आहे. किसान सभा आमच्यासोबत यावी यासाठी बोलणी सुरु आहे.

धनगर, मराठा आरक्षण हे सरकारने प्रलंबित ठेवले आहे. धनगर समाजाला भाजपचे खरे रूप कळले असून, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज एकत्र येत आहे. तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून किती जागा लढवायच्या याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

राम शिंदेंच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे

चौंडी येथील कार्यक्रमात दरवर्षी गोंधळ होतो. मात्र यावर्षी मुद्दामहून या प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आले. डॉ. भिसे हे कार्यकर्त्यांसह संयमाने आंदोलन करत असतांना पोलिसांवर दगड फेकल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार मंत्री राम शिंदे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला.