Tue, Jul 16, 2019 00:23होमपेज › Ahamadnagar › त्यांनी जिल्हा विभाजनाची भाषा करू नये

त्यांनी जिल्हा विभाजनाची भाषा करू नये

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जामखेड : प्रतिनिधी

ज्यांना जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्ज माफीचे तीनशे कोटी रुपये देता आले नाही, त्यांनी जिल्हा विभाजनाची भाषा करू नये. जिल्हा विभाजनासाठी 500 कोटी रुपये लागतात, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा. त्यांची कोणाबरोबर सेटिंग आहे हे आपल्याला माहीत आहे, असा खळबळजनक आरोप डॉ. सुजय विखे यांनी केला. 

जामखेड येथे डॉ. सुजय विखे यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात, माजी उपसभापती अंकुश ढवळे, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष अरुण वराट, बंकटराव बारवकर, किसनराव ढवळे, भारत काकडे आदी उपस्थित होते.डॉ. विखे म्हणाले, मी मूळ राजकारणी नाही. राजकीय प्रवासात मी भरकटलो गेलो आणि राजकारण आलो आहे. जिल्हा विभाजनावर जिल्हातील पुढारी बोलत नाहीत. फक्त पालकमंत्री शिंदे बोलत आहेत.

त्यांना विभाजन करून काय साध्य करायचे आहे, ते कळत नाही. या विषयामुळे ना. शिंदे इतर प्रश्न विसरून गेले आहेत. विभाजनामुळे जनतेचा काय फायदा होणार, हे पालकमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. विभाजन करण्याअगोदर जामखेड तालुक्यातील एमआयडीसी, कुकडीचे पाणी, युवकांना रोजगार, तालुक्यातील प्रमुख कार्यालयांत असणारे प्रभारी अधिकारी राज संपवा, शेतकर्‍यांना कर्ज माफीचे पैसे द्या, ग्रामसेवकांची रिक्त पदे भरा. हे प्रश्‍न सोडवा मगच जिल्हा विभाजन करा. तालुक्यात अनेक प्रश्न असताना लोक यांना कसे निवडून देतात, हे कळत नसल्याचेही ते म्हणाले.

मी अजून उमेदवारीची घोषणा केली नाही. माझा पवित्रा सावध राहणार आहे. जनतेला चांगला पर्याय मिळाला, तर नक्की जनता स्वीकारते. राजकारणात आश्‍वासनापलीकडे जाऊन काम केले पाहिजे. आज जामखेडला येत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी आणला आहे. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे केली जाणार आहेत, असेही डॉ. विखे म्हणाले.

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, language, district division


  •