Tue, Mar 19, 2019 09:24होमपेज › Ahamadnagar › ‘ते’ हल्लेखोर पालकमंत्र्यांचे समर्थक!

‘ते’ हल्लेखोर पालकमंत्र्यांचे समर्थक!

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 11:10PMजामखेड : प्रतिनिधी

डॉ. सादीक पठाण व कय्युम शेख यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी हे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पाठबळावरच जामखेड शहरात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत, असा आरोप करत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी गोळीबार प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली.

जामखेड शहरातील नगर रस्त्यावर पंचायत समितीसमोर गुरुवारी (दि.1) दुपारी बारा वाजता डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख  यांच्यावर राजकीय वैमनस्यातून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याच्या निषेधार्थ काल (दि.6) दुपारी 1 वा मुस्लिम समाज व इतर समाजबांधवांनी तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढला. या वेळी युवा नेते जयदत्त धस, अझर काझी, नगरसेवक शामीर सय्यद, पवन राळेभात, डिगांबर चव्हाण, अमित जाधव यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. 

यावेळी राळेभात म्हणाले, हा मूक मोर्चा असला, तरी आपण बोललो नाही, तर समजणार कसे. जामखेडला कोणताही अधिकारी थांबण्यास तयार नाही. सर्व अधिकारी प्रभारी. पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते अधिकार्‍यांना दमबाजी करतात.आपल्याला काही तरी मिळेल, याउद्देशाने आमच्या गटाचे काही नगरसेवक पालकमंत्री राम शिंदे यांच्या गटाकडे गेले. परंतु त्यांना काही मिळणार नाही. कारण भाजपमध्ये अलिबाबा राम शिंदे, तर त्याचे कार्यकर्ते चाळीस चोर आहेत. जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपला स्वार्थ साधण्याचे काम भाजप करत आहे.

यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त करताना गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याला जात नसते. जामखेड शहरात भरदिवसा गोळीबार होतो. या घटनेमुळे जामखेडचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही. जामखेड तालुक्यात गुन्हेगारीने डोके बाहेर काढले आहे. त्यावर पोलिसांचा वचक नाही. पालकमंत्र्यांच्या तालुक्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या जातात, हे दुर्दैव असल्याचे सांगितले.