Thu, Mar 21, 2019 11:40होमपेज › Ahamadnagar › फळ्या टाकून पाणी अडविता येणार!

फळ्या टाकून पाणी अडविता येणार!

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 28 2018 11:58PMकोपरगाव : प्रतिनिधी

गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यात 31 ऑक्टोबर पूर्वी फळ्या टाकून पाणी अडविता येईल, असा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्शी व त्यांच्या सहकार्‍यांनी दिल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी दिली.

कोपरगाव तालुका अवर्षणग्रस्त असल्याने येथील शेतकर्‍यांसाठी त्यांच्या व सभासदांच्या सहकार्याने संजीवनी सहकारी साखर कारखान्याने गोदावरी नदीवर हिंगणी मंजूर आणि सडे (संयुक्त) हे तीन बंधारे कोट्यवधी रूपये खर्च करून बांधले. मा,  जलसंपत्ती प्राधिकरणाने 19 सप्टेंबर 2014 रोजी निर्णय करून या बंधार्‍यात 31 ऑक्टोबर पूर्वी पाणी साठविता येणार नाही असे आदेश जारी केले होते.  त्याबाबत आ. स्नेहलता कोल्हे व संजीवनी कारखान्याने मुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री यांना कोपरगाव तालुक्यातील अवर्षणप्रवणग्रस्त भागातील स्थिती आणि दरवर्षी सुरू होणारा पावसाळा येथे शाश्‍वतरित्या पडत नाही. पडलाच तर उशीरा पडतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे खरीप व फळबाग पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत आहे.  

परिणामी शेतकरी उध्दवस्त झाला आहे. त्यासाठी शासनाने यात हस्तक्षेप करुन सेशन 23 नुसार निर्णय करावा अशी विनंती केली होती. ती शासनाने मान्य केली. त्यातच खरीप भुसार पीके घेण्यासाठी शाश्‍वत पाणी काही प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी संजीवनीने कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधले पण त्यात 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी अडविता येणार नाही असे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने केले होते. त्यावर संजीवनी व अन्य याचिकाकर्त्यांनी जलसंपत्ती प्राधिकरणास  याबाबतची वस्तुस्थिती निर्दशनास आणून यातून होणार्‍या नुकसानीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे हे पटवून दिले.

कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यात पावसाचे पडणारे पाणी अडवू दिले जावे, असा युक्तीवाद केला. प्राधिकरणाने तो मान्य करत शासनाच्या घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यात आता 31 ऑक्टोंबरपूर्वी फळ्या टाकून पाणी अडविता येईल असे आदेश 26 जुलै रोजी निर्णय क्रमांक 12 नुसार प्राधिकरणांचे अध्यक्ष के.पी. बक्शी व कार्यकारी अभियंता व्ही.एम. कुलकर्णी, व्ही.जे. तिवारी (विधी) व एस.पी. सांगळे (अर्थ) या सदस्यांनी जारी केले आहे.