Sun, Mar 24, 2019 07:01होमपेज › Ahamadnagar › अनुदान मिळाल्याशिवाय माघार नाही

अनुदान मिळाल्याशिवाय माघार नाही

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 13 2018 12:10AMपारनेर : प्रतिनिधी

संजय गांधी तसेच इतर योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय माघार नाही. भलेही प्राणाची बाजी लागली तरी बेहत्तर, असा दृढ निश्‍चय करीत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी गुरूवारपासून तहसील कार्यालयासमोर अन्यायग्रस्त लाभार्थी तसेच शेकडो समर्थकांसह  उपोषणास प्रारंभ केला. 

संजय गांधी निराधार योजनेच्या 30 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत श्रावणबाळ, विधवा, परित्यक्या, अपंगांचे 2 हजार 195 प्रस्ताव अनुदानाच्या प्रस्तावासाठी मांडण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 132 प्रकरणे मंजुर करण्यात आली. गोरेगाव व हिवरेकोरडा येथील 210 लाभार्थ्यांचेही प्रस्ताव या बैठकीत मंजुर करण्यात आले होते. परंतु या दोन्ही गावांतील लाभार्थी वगळता इतर सर्व गावांतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले. हे अनुदान तहसील कार्यालयाकडे जमा झालेले असतानाही केवळ राजकीय व्देशातून ते देण्यात आडकाठी आणण्यात आल्याचा लंके यांचा आरोप आहे.

गेल्या 3 महिन्यांपासून लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिल्याने त्यांना न्याय देण्यासाठी लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही गावांमध्ये ग्रामसभा घेऊन प्रस्तावांची सत्यता पडताळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन्ही गावांत ग्रामसभांचे बुधवारी आयोजन करण्यात आले. हिवरे कोरडा येथील ग्रामसभेत सर्व 67 प्रकरणांना मंजुरी दिली तर गोरेगाव येथील सरपंचांनी ग्रामसेवक हजर नाहीत. अजेंडा देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी हवा, असे कारण देत ग्रामसभा पुढे ढकलली. परिणामी प्रशासनाने प्रयत्न करूनही आंदोलनापूर्वी तोडगा निघू शकला नाही.

गुरूवारी सकाळी नीलेश लंके अन्यायग्रस्त लाभार्थी तसेच शेकडो समर्थकांसह तहसील कार्यालयात दाखल झाले. आवारात वृक्षारोपण करून त्यांनी उपोषणास प्रारंभ केला. तहसीलदार भारती सागरे यांनी लंके यांना चर्चेसाठी दालानात आमंत्रित केले. परंतु जनतेचा प्रश्‍न आहे. जनतेसमोर बोला अशी भूमिका लंके यांनी घेतली. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनीही मध्यस्तीचा प्रयत्न केला. मात्र त्यातही यश आले नाही. अखेर सागरे यानीं स्वतः उपोषणस्थळी येऊन चर्चा केली. 

हिवरे कोरडाचा प्रश्‍न सुटला असून ग्रामसभेनंतर गोरेगावचाही मार्गी लागेल, असे सागरे यांनी सांगितले. परंतु या योजनांसाठी राज्यात कोठे ग्रामसभा झाली, असा प्रतिप्रश्‍न करीत खात्यावर रक्कम जमा होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार लंके, अन्यायग्रस्त लाभार्थी तसेच समर्थकांनी घेतल्याने आंदोलन उशीरापर्यंत सुरूच होते. नीलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापू शिर्के, दादा शिंदे, अभयसिंह नांगरे, बाळासाहेब नरसाळे, ठकाराम लंके, दौलत गांगड, संदीप सालके, अरूण पवार, विजय औटी, प्रशांत औटी, अनिल गंधाक्ते, प्रितेश पानमंद, अंबादास नांगरे यांच्यासह मान्यवर आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आ. औटींचे पत्र सार्वजनिक करा : लंके  

योजना समितीच्या अध्यक्षांनी 10 एप्रिल रोजी दिलेल्या पत्रानुसार प्रकरणांना स्थगिती देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी संदीप आहेर यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. अध्यक्ष आ. विजय औटी यांनी दिलेले पत्र अन्यायग्रस्त लाभार्थ्यांना देऊन ते सार्वजनिक करण्याची मागणी नीलेश लंके यांनी केली.