होमपेज › Ahamadnagar › निवड होऊनही निधी देण्याची घोषणा कागदावरच

‘स्मार्ट ग्राम’ वार्‍यावरच!

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 10:37PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 14 गावांचा स्मार्ट ग्राम म्हणून विकास करण्यात येणार आहे. शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधून प्रत्येकी 1 अशा 14 गावांची तालुकास्तरीय समितीने निवड केली असून, या 14 गावांना प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. मात्र निवड होऊनही या गावांना निधी देण्यात न आल्याने निधी देण्याची शासनाची घोषणा कागदावरच राहिली आहे.

राज्यातील गावांचा शाश्‍वत विकास होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. त्या पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करून शासनाने स्मार्ट ग्राम योजना सुरु केली आहे.

या योजनेसाठी गावांची निवड करताना 5 हजार लोकसंख्येपेक्षा मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणार्‍या ग्रामपंचायती, आदिवासी/ पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार सदर ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर, असे गुणांकन झाले.

जिल्ह्यातील 301 ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदविला. या 301 ग्रामपंचायतीत तालुकास्तरीय समितीने पाहणी करून गुणांकन केले. गुणांकनात सर्वात जास्त गुण असलेल्या 25 टक्के ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. समितीने 25 टक्के निवड केलेल्या गावांमधून 14 गावांची निवड स्मार्ट ग्राम मध्ये केली. योजनेत समाविष्ठ झाल्यास निधी मिळेल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र फक्त प्रमाणपत्रच मिळाले आहे.

जिल्हास्तरावरील निवड रखडली

जिल्हास्तरावर 14 गावांमधून एका गावाची निवड होणार आहे. जिल्हा स्तरावर निवडलेल्या गावाला 40 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. या गावांची पाहणी समितीने केली असून, संबंधित गावाचे नावही निश्‍चित झाले आहे. मात्र हे नाव जाहीर करण्यात शासनाने तूर्तास मनाई केल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. निधीची चणचण असल्याने तात्पुरती स्थगिती असल्याचीही चर्चा आहे.

निधीपासून वंचित स्मार्ट ग्रामपंचायती

अकोले - धुमाळवाडी, संगमनेर - गुंजाळवाडी, कोपरगाव - भोजडे, राहाता - रुई, श्रीरामपूर - खंडाळा, राहुरी - गणेगाव, नेवासा - गोगलगाव, शेवगाव - ठाकूर पिंपळगाव, पाथर्डी - लोहसर, जामखेड - सातेफळ, कर्जत - निमगाव गांगर्डा, श्रीगोंदा - कौठा, पारनेर - जामगाव व वडनेर बु. विभागून, नगर - मांजरसुंबा.