होमपेज › Ahamadnagar › आधार कार्डनेचे आधार, नाही तो निराधार!

आधार कार्डनेचे आधार, नाही तो निराधार!

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:08AMनगर : प्रतिनिधी

आधार कार्डशिवाय व्यक्तीला यापुढे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून आधार कार्डनेच आधार आहे..नाही तर तो निराधार आहे. म्हणून सर्व कुटूंब प्रमुखांनी स्वत:बरोबरच कुटूंबाच्या सदस्यांच्या आधार कार्डच्या नोंदणीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन खा.दिलीप गांधी यांनी केले.

प्रधान डाकघर येथे आधार नावनोंदणी आणि अद्ययावत सेवा केंद्राचा शुभारंभ खा.गांधी यांच्या हस्ते झाला. यावेळी बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक अजातशत्रू सोमाणी, वरिष्ठ डाक अधीक्षक जालिंदर भोसले, नगरसेवक किशोर डागवाले, सागर गोरे, श्रीरामपूर डाक अधीक्षक उमेश जनावडे,  संदीप हदगल आदींसह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. खा. गांधी पुढे म्हणाले, केंद्रीय संचार मंत्री मनोज सिन्हा यांनी पोस्ट खात्याकडे विशेष लक्ष दिले असून, कारभार वाढविला आहे. त्यामुळे अत्याधुनिक बँकींग, विमा, आधार कार्ड नोंदणी सारख्या सुविधा पोस्ट ऑफिसद्वारे मिळणार आहेत.  

याप्रसंगी अजातशत्रू सोमाणी म्हणाले, आधार कार्ड नोंदणी खाजगी कंपन्यांच्या मार्फत करण्यात येत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरवापर व चुकीचे काम होत होते. त्यामुळे सरकारने आधार नोंदणीचे काम पोस्ट ऑफिसमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल मार्फतही जिल्ह्यात पाच ठिकाणी आधार नोंदणी होणार आहे. 

याप्रसंगी जालिंदर भोसले म्हणाले, सरकारने खाजगी आधार नोंदणी केंद्र बंद केली आहेत. आता नगर शहरात पाच ठिकाणी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पोस्ट ऑफिसमध्ये ही आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे आता जनतेची फसवणुक होणार नाही. या नवीन उपक्रमासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे अधिक पारदर्शकतेने व वेगाने आधार नोंदणीचे काम मोफत करण्यात येणार आहे.