Fri, Feb 22, 2019 15:36होमपेज › Ahamadnagar › चोरीच्या उद्देशानेच वृद्धेचा खून

चोरीच्या उद्देशानेच वृद्धेचा खून

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 12:09AMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

शहरातील अष्टवाडा परिसरात चोरट्यांच्या मारहाणीत दुर्गा कोष्टी या वृद्धेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, घरातून दहा तोळे सोन्यासह रोख आठ हजार, असा 1 लाख 82 हजार 500 रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद ओंकार कोष्टी यांनी दिली आहे. पोलिसांनी तपासासाठी दोन पथके तयार केली असल्याची माहिती दिली.

शहरातील अष्टवाडा परिसरातील दुर्गा कोष्टी या वृद्धेचा मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. यावेळी कोष्टी यांच्या अंगावरील दागिने तसेच असल्याने खून नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याचा उलगडा पोलिसांना झाला नव्हता. मात्र, या प्रकरणी दुर्गा कोष्टी यांचे पती ओंकार कोष्टी यांच्या फिर्यादीवरून घरातील कपाटातून सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, तीन तोळे वजनाचे सोन्याचे दोन गंठण, एक तोळ्याचा सर व  एक अंगठी, रोख आठ हजार व एक साधा मोबाईल, असा एकूण 1 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्यापपर्यंत आरोपींचा शोध पोलिसांना लागलेला नाही. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी या प्रकरणी दोन तपास पथके तयार करण्यात आल्याची माहिती दिली. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची देखील मदत घेण्यात येणार आहे.  या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.2) सकाळी कोष्टी यांच्या घरापासून पोलिस ठाण्यावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.