Wed, Apr 24, 2019 08:28होमपेज › Ahamadnagar › महिलांनी बिबट्याच्या जबड्यातून सोडविली शेळी

महिलांनी बिबट्याच्या जबड्यातून सोडविली शेळी

Published On: Jun 05 2018 1:15AM | Last Updated: Jun 04 2018 11:39PMजवळा : वार्ताहर

जवळा (ता. पारनेर) येथील आदिवासी ठाकर समाजाच्या दोन महिलांनी शेळीवर हल्ला करून तिला घेऊन जाणार्‍या बिबट्याला  धाडसाने पळवून लावत शेळीची सुटका केली. या धाडसाबद्दल सदर महिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

येथील पाटीलमळा शिवारातील घोडेपट्टी नावाच्या शेतात रविवारी (दि. 3) संध्याकाळी 4 च्या सुमारास सुनीता अंकुश देशमुख व अशाबाई अनिल जाधव या दिवसभर शेळ्या चारून घरीपरतत होत्या. त्याचवेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळीवर झडप घातली. शेळीची मान जबड्याट पकडून तिला फरपटत घेऊन जाऊ लागला. त्याचवेळी सुनीता देशमुख व आशाबाई जाधव या दोन महिलांनी स्वतःला सावरत शेळीला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आरडा ओरडा करत हातातील काठ्यांचा धाक दाखवत बिबट्यास हुसकावून लावत शेळीला सोडविले. बिबट्यानेही कोणताही प्रतिकार न करता माघार  घेत गुमान काढता पाय घेतला व पुन्हा उसात धूम ठोकली. त्यामुळे या महिलांच्या  धाडसाचे जवळा परिसरातून कौतुक होत आहे.

याच घटनेनंतर रात्री तेथून एक दीड किमी अंतरावर पहाटे तीन वाजता अलभरवस्तीनजीक राहणारे अशोक मोतिराम मधे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्यास उसात नेऊन त्याचा फडशा पाडला. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शेतकरी रात्री शेतावर जायला किंवा बाहेर निघण्यास धजावत नाहीत.

बिबट्याचा पिंजर्‍याला गुंगारा 

मागील दहा दिवसांपासून वनखात्याने गणीसोड परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. बिबट्या सर्वांनाच गुंगारा देत आहे. मात्र वनविभाग तोंडावर बोट ठेवून आहे. बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहीम वनविभागाने कडक करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.