Wed, Nov 21, 2018 17:49होमपेज › Ahamadnagar › चोरट्यांच्या मारहाणीत महिला गंभीर जखमी

चोरट्यांच्या मारहाणीत महिला गंभीर जखमी

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:43AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

तालुक्यातील दरेवाडी येथे बुधवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून लुटमार केली. महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातल्याने तिला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चोरट्यांनी जखमी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दरेवाडीतील हरीकृष्णनगर येथे ज्ञानदेव बेरड यांचे किराणा दुकान आहे. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दुकानामागील दरवाजा तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरवाजा उघडल्याचा आवाज आल्याने ज्ञानदेव यांच्या पत्नी दीपाली यांना जाग आली. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातला. या आवाजाने घरातील लहान मुलेही उठली. त्यामुळे मोठा आरडाओरडा झाला. ते पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला. मात्र जाताना दीपाली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. दरोडेखोरांनी दीपाली यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातल्यामुळे त्यांच्या डोक्यात 11 टाके पडले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिंगार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मंगळवारी ज्ञानदेव बेरड हे बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची लहान मुले, पत्नी व वृद्ध आई-वडील होते. त्यामुळे लक्ष ठेऊनच चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.