Thu, Nov 15, 2018 18:14होमपेज › Ahamadnagar › ..अन् तिने बिबट्याला पिटाळले

..अन् तिने बिबट्याला पिटाळले

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 10:46PMराहुरी : प्रतिनिधी

परिसरातील नर्सरी येथील एका महिलेने धाउस दाखवित चक्क बिबट्यावर दगडांनी हल्ला करून त्याच्यावर हातातील खुरप्याचा धाक दाखवून त्याला पिटाळून लावल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

नर्सरी येथील शेतकरी महिला मीना मधुकर राजुळे (वय 53) या शेताच्या बांधावर गवत घेत होत्या़  गवत घेत असताना त्यांच्याकडे बिबट्या चालून येत असल्याचे दिसले. बिबट्या चालून येत असल्याचे पाहून त्यांनी शेजारी असलेल्या दगडांचा वर्षाव बिबट्यावर केला. तरीही बिबट्या मीना राजुळे यांच्या दिशेने येत होता़  जवळ कुणीही नसल्याने बिबट्याशी प्रतिकार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला़ साठ-सत्तर फुटांवर बिबट्या आल्यानंतर मीना राजुळे यांनी हातात असलेले खुरपे घेऊन चक्क बिबट्यावर उगारले. यानंतर बिबट्याही थोडा थबकला. त्यानंतर पुन्हा मीना या बिबट्याच्या दिशेने खुरपे घेऊन धावल्या. मीना यांनी बिबट्याच्या दिशेने चाल केल्यानंतर बिबट्याने क्षणाचाही विचार न करता घासाच्या रानातून उसाच्या दिशेने धूम ठोकली़ त्यानंतर मीना राजुळे यांनी शेताच्या बांधावरचे गवत खुरपून गवताचे गाठोडे डोक्यावर घेऊन घर गाठले़

मीना यांनी  घरी आल्यानंतर बिबट्याला पिटाळून लावल्याचे सांगितले़ मात्र एवढे सोपे आहे का? असे म्हणत घरच्यांनी विषय हसून नेला़  मात्र, आपण बिबट्याला पिटाळून लावल्याचे समाधान राजुळे यांच्या चेहर्‍यावर दिसत होते़ नर्सरी परिसरात गेल्या महिन्यापासून अनेकांनी बिबट्या पाहिला आहे़  त्यामुळे शेतमजूरही शेतात जायला घाबरतात़  वनखात्याकडे कुणीही तक्रार केली नसल्याने अजून परिसरात पिंजरा लावलेला नाही़ अनेक जण बिबट्याच्या धाकाने एकटे शेतात जात नाहीत़  मला बिबट्याची भीती वाटत नाही. पहिल्यांदाच बिबट्या दिसला़  रडण्यापेक्षा लढण्याचा निर्णय घेतला़ बिबट्यावर खुरपे घेऊन धावल्याने त्याला पळून जावे लागल्याचे राजुळे यांनी सांगितले.