होमपेज › Ahamadnagar › सार्वजनिक जीवनात स्त्री सुरक्षित नाही

सार्वजनिक जीवनात स्त्री सुरक्षित नाही

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 12:11AMनगर : प्रतिनिधी

आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा मागे नाही. कित्येक क्षेत्रात स्त्रीने पुरुषालाही मागे टाकले. मात्र, असे असतानाही सार्वजनिक जीवनात आज स्त्रीला सुरक्षित वाटत नाही. कारण सावित्रीच्या आजच्या आधुनिक लेकीला ज्योतिबाचा पुत्र समानतेचा संस्कार देतो का? खर्‍या अर्थाने न्याय देतो का? हा खरा प्रश्‍न आहे. यासाठी समाज शिक्षित व सुदृढ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत देशमुख यांनी ‘21 व्या शतकातील स्त्री पुरुष तुलना’, या विषयावर पहिले पुष्प गुंफले. या व्याख्यानमालेचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक आ.अ.ढोके, वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक,  शिल्पा रसाळ, अजित रेखी, उदय काळे, विक्रम राठोड, ग्रंथपाल संजय लिहिणे, प्रा.मेधाताई काळे, किरण आगरवाल आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, स्त्री ने आत्मनिर्भर असणे ही काळाची गरज आहे. गेल्या दीडशे वर्षात पुरुष बदलला नाही. त्याची मानसिकता फारशी बदलली नाही. पण दीडशे वर्षात स्त्री मात्र कमालीची बदलली. स्त्री पुरुष तुलना म्हणत असताना स्त्रीने थोडे पुरुष होण्याची व पुरुषाने स्त्री होण्याची गरज आहे. थोडेक्यात दोघांनाही अर्धनारी नटेश्‍वरासारखे असावे. म्हणजे संसार सुखाचा होईल.यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेच्या वतीने अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के, डॉ.शीतल म्हस्के, प्रा. मेधा काळे, शिल्पा रसाळ, श्याम शिंदे, गणेश भगत यांनी देशमुख यांचा सत्कार केला. तसेच मसाप सावेडी उपनगर शाखेच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सचिव जयंत येलूलकर, शारदा होशिंग यांनीदेशमुख यांचा सत्कार केला.