Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात बंदला हिंसक वळण

जिल्ह्यात बंदला हिंसक वळण

Published On: Jul 25 2018 1:36AM | Last Updated: Jul 25 2018 12:48AMनगर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काकासाहेब शिंदे या आंदोलक तरुणाने गोदावरीत उडी मारून जलसमाधी घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. संगमनेरमध्ये एसटी बस जाळण्यात आली. शेवगावमध्येही बसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. 

मराठा आरक्षणाचे आंदोलन सर्वत्र तीव्र झाले असतानाच काल (दि.24)संगमनेरमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. तालुक्यातील वडगाव पान शिवारात बंद असलेल्या टोलनाक्याजवळून जात असलेली नाशिक आगाराची नाशिक-पंढरपूर बस (क्र.एमएच20-बीएल0215) अज्ञात सहा ते आठ जणांनी अडविली. त्यातील प्रवाशांना खाली उतरवून ही बस पेटवून दिली. याबाबत चालक कमलाकर पंडित यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात सहा ते आठ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या बंदच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. शेवगावमध्ये एका एसटी बसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. क्रांती चौकात रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदविला. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे नगर-दौंड रस्त्यावर आंदोलकांनी रास्तारोको सुरू केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. कर्जत तालुक्यातही रास्तारोको  आंदोलन करून बंद पाळण्यात आला. पाथर्डीतही रास्ता रोको करण्यात येऊन, सर्व व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला अला. शहरातील सर्व शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. आंदोलकांकडून खर्डा येथे रास्तारोको करण्यात आला आहे. पारनेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, अकोले, राहाता व कोपरगाव तालुक्यांत रास्तारोको, मोर्चे, निवेदने आणि बंद पाळून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. संगमनेरात प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. श्रीरामपुरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन निषेध सभा घेत शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले. या आवाहनाला व्यापार्‍यांनी 100 टक्के प्रतिसाद दिला. राहुरी व राहुरी फॅक्टरी येथे रास्तारोको  आंदोलन करून सरकारच्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदविण्यात आला. राहात्यात कडकडीत बंद पाळून, मराठा बांधवांनी रास्तारोको आंदोलन केले. लोणीत निषेध सभा घेण्यात आली. शिर्डीत काँग्रेसने निवेदन देवून मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कोपरगाव तालुक्यातही बंदला व्यापार्‍यांनी पाठिंबा दिल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. दरम्यान, नगर जिल्ह्यातील बंदमुळे नगर-औरंगाबाद एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. दोन्ही बाजूने काल सकाळपासून दिवसभर एकही एसटी बस धावली नाही. जामखेड, शेवगाव आणि मिरजगाव भागातही एसटी बंद ठेवण्यात आल्या होत्या.