Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Ahamadnagar › वानर अन् कुत्र्याची अनोखी मैत्री!

वानर अन् कुत्र्याची अनोखी मैत्री!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी

मैत्री ही अशी गोष्ट आहे की ती कुणाशीही होऊ शकते. त्याला कुठलेच बंधन आडवे येत नाही. अशाच वानर आणि कुत्र्याच्या या अनोख्या मैत्रीचा अनुभव श्रीगोंदा शहरवासियांना सध्या अनुभवयास येत आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वन्यप्राणी पाण्याच्या व अन्नाच्या  शोधार्थ लोकवस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत जाऊन पोहचला आहे.

मागील आठवड्यापासून शहरासह तालुक्याच्या विविध भागात वानरांचे वास्तव्य आहे. असेच एक वानर काल श्रीगोंदा शहरात दाखल झाले. मात्र, या वानराच्या सोबतीला एक कुत्र्याचे पिल्लू होते. या लहानशा कुत्र्याच्या पिल्लाला कवेत घेऊन हे वानर या झाडावरून त्या झाडावर बागडत होते. कुत्र्याचे पिल्लूही आईच्या कुशीत विसावल्यासारखे निर्धास्त होते.  हे वानर स्वतःच्या पिल्लाप्रमाणे कधी त्या पिल्लाला गोंजारत होते तर कधी खेळवत होते. एक क्षणभरही या पिलाला बाजूला जाऊ देत नव्हते. या अनोख्या जोडीचे श्रीगोंदेकराना मोठे कुतूहल वाटत होते. 

शहरातील लहान मुले तर दिवसभर या जोडीचा पाठलाग करत होते.  दरम्यान, या कुत्र्याच्या पिल्लाला कुठलीही इजा होउ नये म्हणून वनविभागाच्या अधिकारी अश्‍विनी दिघे, रवींद्र तुपे यांनी कर्मचारी पाठवून त्या वानराच्या तावडीतून कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. मित्राची ताटातूट झाल्यानंतर हे वानर काही काळ चांगलेच सैरभैर झाले होते.  एकीकडे माणसे माणसापासून दुरावत चालली आहेत. स्वार्थापायी कुणी कुणाचा विचार करायला तयार नाही. अशा या जमान्यात वानर आणि कुत्र्याच्या अनोख्या मैत्रीची कथा काही न्यारीच म्हणावी लागेल.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Shrigonda, friendship, monkey, dog,


  •