Thu, Jul 18, 2019 06:07होमपेज › Ahamadnagar › चौंडीतील अहिल्यादेवी शिल्पसृष्टीची मोडतोड

चौंडीतील अहिल्यादेवी शिल्पसृष्टीची मोडतोड

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:29PMजामखेड : प्रतिनिधी

धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय राज्यात पेटला असतानाच आता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे उभारलेल्या काही मौल्यवान शिल्पांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात शिल्पसृष्टीचे निर्माते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने  चौंडी अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथील शिल्पसृष्टीत 12 राशी बसविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तूळ राशीच्या हातात असलेला तराजू तोडून, त्यातील लोखंडी साखळ्या चोरीस गेल्या आहेत. सहा खांब तोडून पाण्याच्या ठिबक सिंचनचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच सूर्याच्या रथातील चार साखळ्याही तोडून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असून, माजी मंत्री अण्णा डांगे हे बाहेरगावी असल्यामुळे शुक्रवारी या संदर्भात पोलिसांना कळविले. मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष आ. रामहरि रूपनर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन माहिती घेण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.