होमपेज › Ahamadnagar › ग्रामस्थांनीच पकडला वाळू उपसा करणार ट्रॅक्टर

ग्रामस्थांनीच पकडला वाळू उपसा करणार ट्रॅक्टर

Published On: May 09 2018 1:52AM | Last Updated: May 08 2018 11:36PMजामखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपरखेड गावालगत विंचरणा नदीतून पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी तहसीलदार व त्यांच्या पथकाला माहिती दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला त्याची माहिती दिली. त्यानंतर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला. मात्र एक ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. 

पिंपरखेड गावालगत विंचरणा नदी आहे. मागील तीन-चार वर्षे दुष्काळाचे चटके येथील गावकर्‍यांनी वाळू उपसा झाल्यामुळे सोसले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील वाळू लिलावास ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी विरोध केला होता. तसेच वाळूचे संरक्षण केले होते. विंचरणा नदीपात्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाळू आहे. मागील पंधरा दिवसांपासून येथील विंचरणा नदीपात्रातून वाळूउपसा होत आहे. याबाबत तहसीलदार, महसूल कर्मचारी व पथकाला ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. 

महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गावकर्‍यांनी वाळूउपसा करणारे टॅक्ट्रर नदीत रोखून धरले होते. तसेच तहसीलदारांना दूरध्वनी करून माहिती दिली होती. परंतु त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तहसीलदारांनी नायब तहसीलदार अविनाश रणदिवे व दोन कर्मचार्‍यांचे पथक पाठवले. पथक येईपर्यंत एक चालक ट्रॅक्टर घेऊन पळून गेला, तर एका ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला.  तालुक्यातील नदीपात्रांत बेसुमार अवैध वाळूउपसा सुरू आहे. याबाबत येथील महसूल प्रशासन तक्रार करूनही दखल घेत नाही. त्यामुळे आता थेट जिल्हाधिकार्‍यांना दूरध्वनी करूनच तालुक्यातील अवैध वाळू उपसा थांबवला जाईल, अशा प्रतिक्रिया धनेगाव, दिघोळ, जातेगाव, भवरवाडी, नान्नज, जवळा येथील ग्रामस्थांनी दिल्या.