Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Ahamadnagar › शिक्षकाचा भावावर पिस्तुलातून गोळीबार

शिक्षकाचा भावावर पिस्तुलातून गोळीबार

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:32AMमढी : वार्ताहर 

बहीण व तिच्या नातेवाईकांना घरी मुक्कामाला ठेवल्याचा राग मनात धरून शिक्षक असलेल्या भावाने माजी सैनिक असलेल्या भावावर पुतणीच्या मालकीच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील पाळीव कुत्रीनेे आडवे येऊन अंगावर गोळी झेलत मालकाला वाचवले. ही कुत्री यात जखमी झाली आहे. या बाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माजी सैनिक बाळासाहेब मरकड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे वस्तीवर राहतात. सुट्टीनिमित्त शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील मुलगी शरयु या कटुंबासमवेत निवडुंगे येथे आलेल्या आहेत. मरकड यांनी इंग्लिश कुत्री पाळलेली आहे. बाळासाहेब यांच्या घराशेजारी त्यांचा भाऊ व तालुक्यातील कडगाव येथे प्राथमिक शिक्षक असलेल्या उद्धव कोंडीराम मरकड यांचे घर आहे. त्यांची पत्नी सुनीता मरकड या सोने येथे शिक्षिका असून तेथेच राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त त्याही निवडूंगेे वस्तीवर राहायला आलेल्या आहेत. 

उद्धव मरकड यांना दारूचे व्यसन आहे. गेल्या नऊ तारखेला नातेवाईकांच्या लग्नानिमित्त बहीण तिसगावहून मुक्कामाला निवडुंगे येथे भावाकडे आली होती. त्यावेळी बहिणीला मुक्कामाला का ठेवले, म्हणून उद्धव यांनी भावाशी भांडण केले. काल (दि.14) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घरातील कुत्री भुंकू लागली. त्यावेळी बाळासाहेब यांनी बाहेर येऊन पाहिले असता समोर उद्धव हा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उभा होता. काही  समजण्याच्या आत त्याने एक गोळी झाडली. त्यादरम्यान कुत्री आडवी आल्याने गोळी लागून कुत्री जखमी झाली. त्यानंतर भावाकडे कुटुंबीयांसह जाऊन बाळासाहेब यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उद्धव यांनी गोळी तुलाच मारायची होती, पण कुत्री आडवी आल्याने तू वाचलास, निघून जा नाहीतर गोळ्या घालीन, अशी धमकी दिल्याने सर्वजण निघून गेले.

शिक्षक असलेल्या उद्धव मरकड यांनी ज्या  रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली, त्याचा परवाना त्यांची पुतणी पुष्पा निलेश पानसरे व नीलेश अशोक पानसरे (रा. भगवती कोल्हार, ता.राहुरी) यांच्या नावावर आहे. माहेरी आलेल्या पुष्पा यांनी त्यांचे रिव्हॉल्व्हर चुलत्याकडे दिले होते. त्यानेचत्यांनी भावाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बाळासाहेब मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी उद्धव मरकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पुंडलिक पावसे पुढील तपास करीत आहेत.