Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Ahamadnagar › मुळा पाटबंधारे व ग्रामस्थांचा पेटणार संघर्ष

मुळा पाटबंधारे व ग्रामस्थांचा पेटणार संघर्ष

Published On: May 23 2018 1:06AM | Last Updated: May 22 2018 11:15PMराहुरी : प्रतिनिधी

मुळा धरणातील विषारी मासेमारी रोखण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाने कारवाई हाती घेताना मुळानगर येथील 50 वर्षांपासून रहिवासी असलेल्या ग्रामस्थांनाही अतिक्रमण हटावच्या नोटिसा दिल्याने मुळानगर ग्रामस्थ व पाटबंधारे प्रशासनामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या या निर्णयामुळे आजच्या मुळानगरची ग्रामसभेकडे लक्ष लागले आहे.

मुळा धरणात विषारी मासेमारीचे दि. 30 एप्रिल रोजी ‘पुढारी’ने बिंग फोडले होते. त्यानंतर मुंबई येथील ठेकेदार कंपनीकडून 5 जणांना धरणात विषारी औषध टाकताना रंगेहाथ पकडले. पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाला याबाबत माहिती विचारली असता, विषारी मासेमारी होत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘पुढारी’ने संबंधित प्रकरणाचा यशस्वी पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पुढाकार घेत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला आदेश देत विषारी औषध मासेमारी प्रकरणाचा खुलासा मागितला होता. मत्स विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भादुले, पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता आर. मोरे, महसूल व पोलिस विभाग यांच्या निगराणीत सविस्तर चौकशी होऊन मुळा धरणात विषारी औषधाने मासेमारी होत असल्याचे निष्पन्न झाले होते. मुळा धरणाच्या पश्‍चिमेकडे विषारी औषधाने मासेमारी होत असल्याचे समोर आले होते. या अहवालात अनेकांनी अनधिकृतपणे घरे बांधून पाटबंधारे विभागाच्या जागेत शेती सुरू केल्याचे नमूद होते. यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यवाहीकडे लक्ष लागलेले असताना उपअभियंता शामराव बुधवंत यांनी ‘मुळा’च्या सर्वच भागांत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुळानगर भागात एरिगेशन कॉलनीत गेल्या 50 वर्षांपासून राहणार्‍या 300 कुटुंबांना नोटिसा काढण्यात आल्या. 

दरम्यान, मुळानगर ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्‍त करीत पाटबंधारे विभाग गव्हासोबत किडे रगडण्याचे काम करीत असून, मुळानगर ग्रामस्थांवर एक प्रकार अन्याय करीत असल्याचे सांगितले. पाटबंधारे विभागाला मुळानगर ग्रामस्थांनी नेहमीच सहकार्य केले असून पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या मुळानगर ग्रामस्थांनी आतापर्यंत एकही वाईट कृत्य केलेले नाही.अनेक कुटुंबे धरणाचे काम सुरू झाल्यापासून येथे राहतात. तसेच कृषी विद्यापीठाचे कर्मचारीही अनेक वर्षे या ठिकाणी राहत होते. सध्या मुळा पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी, भूमिहिन, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, मोलमजुरी करणारे कर्मचारी, मच्छिमार येथे राहतात. त्यांच्यापासून धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नाही. धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्यांच्यावर लहानसहान व्यवसाय करून या लोकांची उपजिविका चालते.अनेक वेळा धरणात बुडालेल्या पर्यटकांना बाहेर काढून कित्येकांचे या लोकांनी प्राण वाचविले आहेत. असे असताना धरणाच्या सुरक्षिततेचे कारण देत या लोकांना विस्थापित करण्याचा डाव पाटबंधारे विभागाचा असल्याचा आरोप होत आहे. आज (दि. 23) मुळानगर येथे होणार्‍या ग्रामसभेत समस्त ग्रामस्थ काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा :  प्रवीण लोखंडे 

मुळा धरणाच्या सुरक्षिततेबाबत मुळानगर ग्रामस्थांनी नेहमीच योगदान दिलेले आहे. पश्‍चिम भागात विषारी मासेमारी केली जात असतान विरोधी दिशेकडील लोकांवर अन्याय केला जात आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यवाहीबाबत तालुक्यातील राजकीय नेत्यांनी सहभाग घेत मुळानगर ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रविण लोखंडे यांनी केली आहे.