Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Ahamadnagar › शहीद कुटे यांचा पुतळा बेवारस अवस्थेत आढळला 

शहीद कुटे यांचा पुतळा बेवारस अवस्थेत आढळला 

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 11:19PMपारनेर : प्रतिनिधी   

वडनेरहवेली येथील शहीद जवान अरूण कुटे यांच्या स्मारकातून वर्षभरापूर्वी चोरीस गेलेला पंचधातूचा पुतळा लोणी हवेली ते जामगाव रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात गुरूवारी रात्री बेवारस स्थितीत आढळून आला. पारनेर पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून कायदेशीर सोपास्कारानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वडनेर हवेली येथील शहीद कुटे यांच्या स्मारकातून 60 किलो वजनाच्या पंचधातूच्या पुतळयाची चोरी केली होती. पुतळा चोरी गेल्याची माहिती कुटे कुटूंबियांना सकाळी समजल्यानंतर सुपे पोलिस प्रशासनास पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला होता. विविध पथकांनी घटनास्थळास भेटी देऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नव्हते. पुतळ्याचा तसेच तो चोरणारांचा तपास लावावा, यासाठी सामाजिक संघटनांनी उपोषणही केले होते.  

लोणीहवेली ते जामगाव रस्त्यालगतच्या खड्ड्यात एक बेवारस पुतळा असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे यांना समजल्यानंतर गाडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, रामेश्‍वर घुगे, हवालदार महंमद शेख, पोलिस मित्र बाळासाहेब हिलाळ, होमगार्ड सुनिल कावरे व सोमनाथ सोबले यांनी घटनास्थळी गेल्यानंतर तेथे एक पंचधातूचा पुतळा असल्याचे व तो वडनेर हवेली येथील शहीद जवान अरूण कुटे यांचा असल्याच निदर्शनास आले. पथकाने पुतळा ताब्यात घेतला असून पुढील कायदेशिर बाबिंची पूर्तता केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Tags : Ahmadnagar,  statue,  Shaheed Kute, found, state, shamelessness