Sat, Jul 20, 2019 15:20होमपेज › Ahamadnagar › नायब तहसीलदारांना अडवून तस्करांची दमबाजी

नायब तहसीलदारांना अडवून तस्करांची दमबाजी

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 21 2018 11:58PMनगर : प्रतिनिधी

गौणखनिजाची तस्करांवर कारवाई करण्यासाठी निघालेल्या नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील दोन पथकांवर पाळत ठेवून त्यांना रस्त्यात अडवून दमदाटी केली. काल (दि. 21) पहाटेच्या सुमारास नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी आसिफ बादशहा सय्यद (रा. अकबरनगर, नगर) याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नगरच्या निवासी नायब तहसीलदार अर्चना पागिरे व नायब तहसीदालर (महसूल) वैशाली आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गौणखजिन तस्करीविरुद्ध कारवाई करण्यासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यात मंडलाधिकारी, कामगार तलाठ्यांचा समावेश होता. शुक्रवारी (दि. 20) रात्री 10 वाजता पथके शासकीय वाहनातून कारवाईसाठी निघाली. दुचाकीवरून एक जण त्यांच्यावर पाळत ठेवून होता. त्याने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत महसूलच्या पथकाचा पाठलाग केला. नगर-मनमाड रस्त्यावरील विळद, देहरे, नांदगाव, पुन्हा नगर शहर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असे गौणखनिज पथक फिरत असताना दुचाकीस्वार त्यांचा पाठलाग करीत होता. 

पथक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ असताना सदर व्यक्तीने नायब तहसीलदारांच्या वाहनाला दुचाकी आडवी लावली. त्याने महसूलच्या पथकाला रस्त्यातच दमदाटी सुरू केली. नायब तहसीलदारांच्या पथकातील लोकांनी सदर व्यक्तीस पकले असता त्याने त्याचे नाव आसिफ सय्यद असल्याचे सांगितले. तो त्याच्या मोबाईल क्रमांकावरून पथक कसे फिरत आहे, याची माहिती गौणखनिजाची तस्करी करणार्‍या इतरांना दिल्याची कबुली दिली आहे. गौणखनिजाची वाहतूक करणार्‍यांचे पंटर महसूलच्या अधिकार्‍यांची पाळत ठेवतात, हा प्रकार अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता नायब तहसीलदारांनी तोफखाना पोलिस ठाण्यात पाठलाग करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.