Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Ahamadnagar › विषारी मासेमारीचा दुसरा गुन्हा दाखल

विषारी मासेमारीचा दुसरा गुन्हा दाखल

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:50PMराहुरी : प्रतिनिधी 

मुळा धरणावर विषारी मासेमारी प्रकरणावर ‘पुढारी’ने वाचा फोडल्यानंतर पाटबंधारे व पोलिस सतर्क झाल्यानंतर धरणातील ‘विषारी’ मासेमारीबाबत काल दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला. उपअभियंता शामराव बुधवंत यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, विषारी मासेमारीची दखल घेतल्याबद्दल समाजातून ‘पुढारी’चे विशेष आभार मानले जात आहे. 

मुळा धरणावर बंदूकधारी पोलिसांसह पाटबंधारे व ठेकेदारांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकून जहरी मासेमारी करणार्‍यांना प्रतिबंध बसला आहे. पाटबंधारे विभागाकडून प्रारंभी विषारी औषधाने मासेमारी होत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दैनिक पुढारीने विषारी औषधाच्या वापराने मुळा धरणात मासेमारी होत असल्याचे वृत्त सर्वात अगोदर प्रसिद्ध करीत अवैध मासेमारीचे बिंग फोडले होते. त्यानंतर मासेमारीचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांनी मुळा धरणावर विषारी औषधाचा वापर करणार्‍या 5 जणांना रंगेहाथ पकडले होते. त्यापैकी तिघांना पोलिसांना ताब्यात देत पोलिस ठाण्यात विषारी मासेमारीचा पहिला गुन्हा दाखल केला होता. पहिल्या गुन्ह्यामध्ये निलेश म्हस्के, दत्तु गायकवाड, लखन माळी, पिनू मधे, दत्तात्रय गवळी यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात ठेकेदार कंपनीकडून गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला म्हणून विषारी औषधाने मासेमारी करणार्‍या 15 ते 20 जणांनी एकत्र येत ठेकेदाराच्या तीन कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला केला होता. 

मुळा पाटबंधारे विभागाच्या जागेत राहून अवैध धंदे करायचे व त्यास कोणी विरोध केल्यास मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या या गुंडांमुळे धरण परिसर दहशतीच्या सावटात होते. या घटनेबाबतही दैनिक पुढारीने प्रसिद्धी दिल्यानंतर विषारी औषधाने मासेमारीच्या विषयाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाला घ्यावी लागली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, पाटबंधारे विभागाचे आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री कार्यालयातून घटनेला आळा घालण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पो. नि. प्रमोद वाघ यांना मुळा धरणस्थळी सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले. पाटबंधारे विभागाकडूनही धरण तटावर कर्मचारी तैनात करण्यात आले. तर ठेकेदार कंपनीनेही पोलिस व पाटबंधारे विभागास सहकार्याची भूमिका घेत सुुरक्षारक्षक धरणस्थळी नेमले. याप्रमाणे मुळा धरणाच्या  संपूर्ण तटावर बंदूकधारी पोलिसांसह 44 सुरक्षारक्षक रात्रंदिवस खडा पहारा देत असल्याने अवैध मासेमारीला लगाम बसला आहे. 

पाटबंधारे विभागाकडूनही उपअभियंता शामराव बुधवंत यांनी अज्ञात मच्छिमारांविरोधात विषारी औषध टाकून पाणी दुषित केले जात असल्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. धरणाचे पाण्यात विष टाकून लाखो जीवांशी खेळला जाणारा खेळ बंद झाल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे.तसेच दै. पुढारीने सर्वात अगोदर मुळा धरणातून विषारी औषधाने मासेमारी सुरु असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यामुळेच काल पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक बांधिलकी जपलेल्या दै. पुढारीचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. 

धरण सुरक्षेबाबत सखोल चौकशीची मागणी

जिलेटीनच्या स्फोटाबरोबरच विषारी मासेमारीमुळे मुळा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे धरणावर कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. तसेच येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना  धरण परिसरातील वसाहतीमध्ये राहण्यासाठी निर्बंध घालण्याची गरज आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून धरण सुरक्षेबाबत हलगर्जी करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.