Thu, Apr 25, 2019 11:56होमपेज › Ahamadnagar › शिक्षिकेने दांडी मारल्याने शाळेला कुलूप

शिक्षिकेने दांडी मारल्याने शाळेला कुलूप

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 04 2018 12:09AMकर्जत : प्रतिनिधी 

शिक्षकच शाळेत न आल्याने काल (दि.3) कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथील वर्ग खोल्यांचे कुलपे उघडली नाहीत. वर्ग न उघडल्याने विद्यार्थ्यांनीही काही वेळ शिक्षिकेची वाट पाहिली. मात्र त्यान आल्याने तेही कंटाळून घरी निघून गेले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित शिक्षिकेवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली.

तालुक्यातील कर्जत-कोंभळी-नगर रस्त्यावर खुरंगेवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेची 36 पटसंख्या आहे. येथे दोन शिक्षिका नियुक्तीस असून, त्यातील एक शिक्षिका 19 जून पासून रजेवर आहे. मात्र दुसरी नियुक्तीस असणारी शिक्षिका शाळेकडे फिरकलीच नाही. सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले. मात्र दुपारी दोन वाजले तरी येथे शिक्षिका आल्याच नाही. त्यामुळे ताटकळत बसलेले विद्यार्थी कंटाळले व .शेवटी घरी निघून गेले. मुले घरी लवकर का आली, याची विचारणा पालकांनी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने गावकरी मात्र संतप्त झाले होते. त्यांनी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांना दूरध्वनी करून ही माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी त्याची दखल घेत दुपारी दोन वाजता एका त्रयस्त शिक्षकाला शाळेवर पाठविले. मात्र तोपर्यंत विद्यार्थी घरी गेले होते.

यावेळी संतप्त पालकांनी संबंधित शिक्षिकेस निलंबीत करण्याची मागणी केली. यावेळी पालकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. लोकसहभागातून शाळेचे ग्रामस्थांनी रूप पालटले आहे. तसेच विविध भौतिक सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. मात्र शिक्षकच असे कुठलीही कल्पन न देता गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा, असा सवालही यावेळी पालकांनी उपस्थित केला. 

संबंधित शिक्षिकेवर कारवाई करणार : शिंदे

खुंरगेवाडी येथे दोन शिक्षिका आहेत. एक रजेवर होत्या. दुसर्‍या काही अडचणींमुळे आल्या नाहीत. त्यामुळे शाळा बंद राहिली. ही बाब गंभीर आहे. याची माहिती मिळताच दुसर्‍या शिक्षकास पाठविले. शाळेस भेट दिली असून, संबंधित शिक्षकेवर कारवाई केली जाईल, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.