Fri, Apr 26, 2019 15:56होमपेज › Ahamadnagar › केमिकल्स प्लॅन्टलगतच भरते शाळा!

केमिकल्स प्लॅन्टलगतच भरते शाळा!

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:49PMवारी : प्रशांत टेके

कोपरगाव तालुक्यातील वारी येथे गोदावरी बायोरिफायनरी लि. ही केमिकल्स कंपनी आहे. या कंपनीच्या केमिकल्स प्लॅन्टशेजारीच जि. प. प्राथमिक शाळेची इमारत असून तेथेच शाळा भरविली जाते. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास हे हानीकारक आहे. याबाबत सात आठ वर्षांपासून नागरिक तक्रारी करीत आहेत. तरी देखील याबाबत कार्यवाही होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही शाळा स्थलांतरित करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. 

मागच्या महिन्यात याच कंपनीत काही महिन्यांपूर्वी दुपारच्यावेळी मोठा स्फोट झाला. तेव्हा सुदैवाने सकाळची शाळा असल्याने शाळेत मुले नव्हती. जर मुले शाळेत असती तर मोठा अनर्थ घडला असता. या शाळेशेजारीच कंपनीचे मंगल कार्यालय असून, स्फोट झाला त्या दिवशी तेथे शेजारच्या कान्हेगाव येथील लग्नसमारंभ होता. स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की, लग्नातील वर्‍हाडी घाबरल्यामुळे जोराने ओरडत जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होते. त्यामुळे आता या शाळेत मुलांना पाठविण्याची भीती पालकांना वाटत आहे. पंरतु बहुतांशी मुले ही कंपनी कामगार, कंत्राटी कामगार, तसेच वाड्या-वस्त्यांवर राहणारे शेतमजुरांची आहेत. त्यामुळे  कंपनी व्यवस्थापनाकडे उघडउघड तक्रारी करण्याची हिंमत कामगार करू शकत नाही. कामावरून काढून टाकतील, याची भीती वाटते. 

दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, शाळेच्या इमारतीपासून 200 मीटर अंतरावर दुसरी इमारत बांधण्यास तयार आहोत. पंचायत समितीने बांधकामास परवानगी द्यावी.  इमारत बदलल्यामुळे केमिकल्सचा होणारा दुष्परिणाम कमी होणार आहे का? काही पालकांनी या ठिकाणी शाळा भरविण्यास विरोध दर्शविला, बहुतांशी पालकांचा व नागरिकांचा या प्लँन्ट शेजारी नवीन इमारत बांधण्यास विरोध आहे. उघडपणे ते बोलू शकत नाहीत. सोमैय्या कंपनीचे हायस्कूल आहे, त्या ठिकाणी ही प्राथमिक शाळा भरविता येऊ शकते. पंरतु या प्लँन्ट शेजारीच शाळेची इमारत बांधण्याचा अट्टहास कंपनी व्यवस्थापन का करीत आहे ? हे न उलगडणारे कोडे आहे.