Mon, Aug 19, 2019 13:50होमपेज › Ahamadnagar › न्याय वैद्यकशास्त्राची भूमिका महत्त्वाची

न्याय वैद्यकशास्त्राची भूमिका महत्त्वाची

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

कोर्टातील गुन्हेगारी स्वरुपाच्या केसमधील साक्षी पुराव्यात मानवनिर्मित खोटी अथवा चुकीची येऊ शकते. परंतु साक्षी पुराव्यांना पुष्टी देण्यासाठी न्याय वैद्यकशास्र (फॉरेन्सिक सायन्स) महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने 26/11 किंवा कोपर्डीसारख्या घटनांमध्ये न्याय देऊ शकलो, असे सांगताना प्रवरा अभिमत विद्यापीठाने आयोजित केलेली वैद्यकीय संशोधन परिषद  देशातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले. 

प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचनालय आणि ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लेक्चर हॉलमधील सिंधू, सरस्वती आणि गोदावरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘इन्वेंटम 2018’ वैद्यकीय संशोधन परिषदेचे उद्घाटन अ‍ॅड.  निकम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रो. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय.एम. जयराज, दंत महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. इन. जंगले उपस्थित होते. समन्वयक डॉ. राहुल कुंकूलोळ यांनी प्रास्तविक केले. शर्वरी वैद्य यांनी स्वागत केले.

अ‍ॅड.  निकम म्हणाले की, न्याय वैद्यकशास्रच (फॉरेन्सिक सायन्स) हे कोर्टाच्या कुठल्याही केससाठी पुरावा म्हणून महत्त्वाचा दुवा ठरू शकते. भूतकाळात घडलेल्या घटनेची खरी माहिती फॉरेन्सिक सायन्सच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने निवड करण्यासाठी या शास्राची मोठी मदत होत आहे. तसेच  खुनासारख्या घटनेतील शवविच्छेदनातून अनेक बारीक सारीक गोष्टींची उकल होत असल्याने आरोपीला शिक्षेच्या कटहरयामध्ये  उभे करता येऊ शकते. म्हणूनच फॉरेन्सिक सायन्स, वैद्यकीय सायन्स, माहिती तंत्रज्ञान (जी.पी.एस) ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ मधील प्रगत ज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील भारतीय तरुणांना अशा सेमिनारमधून नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तीन दिवस चालणार्‍या या चर्चासत्रात वैज्ञानिक शोधनिबंध सादर करण्यात येणार असून दि. 30 मार्च रोजी वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील नामांकित वक्ते डॉ. करी रामा रेड्डी, डॉ. विजय दहिफळे, डॉ. अजय कोठारी, डॉ. राजेश्वरी व्होरा, डॉ. जगदीश चतुर्वेदी, आणि. डॉ. पुनम गोयल मार्गदर्शन करणार आहेत. येत्या 31 मार्च रोजी कार्यशाळा घेण्यात येणार असून, यात प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत कौशल्य, आर्थोपेडिक प्ल्यास्टर  कास्ट अप्लिकेशन, ऍनेस्थेशिया कार्यशाळा, डॉक्टर व रुग्ण संबंध याविषयी चर्चा होणार आहे.या परिषदेत सर्वोत्कृष्ट ठरणार्‍या शोधनिबंधासाठी पारितोषिक देण्यात येणार आहे. या अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पदवी घेण्यापूर्वीच गेल्या चार वर्षांत 77 वैद्यकीय संशोधन पूर्ण केल्याने त्यांना आयसीएमआर या संस्थने शिष्यवृत्ती देऊन गौरविले आहे. 

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, role,  jurisdiction, important


  •